मालवणमध्ये वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती नाही….दीपक पाटकर

मालवणमध्ये वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती नाही….दीपक पाटकर

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणमध्ये वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती नाही….दीपक पाटकर*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवणमध्ये कोणत्याही वीज ग्राहकाकडे स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याची कार्यवाही झालेली नाही. ज्या ठिकाणी मीटरची तपासणी आवश्यक आहे, त्याच ठिकाणी वीज वितरण कंपनी तपासणी करून स्मार्ट मीटरची जोडणी करेल, अशी भूमिका शिंदे गट शिवसेना मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांनी स्पष्ट केली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या हिताची कामे करणे हेच शिवसेनेचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी दीपक पाटकर यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अज्ञान प्रकट करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे मित्रपक्ष व सहकारी महाअज्ञानी आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे महायुतीचे मंत्री, आमदार, खासदार आणि पालकमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे विरोधकांनी केवळ टीका करून आपले अज्ञान दाखवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

श्री. पाटकर म्हणाले, शासनाची स्मार्ट मीटर बसवण्याची योजना पूर्णपणे मोफत आहे. ज्यांना त्याची गरज आहे, त्यांच्यासाठीच हे मीटर बसवले जात आहेत. कोणावरही जबरदस्ती केली जात नाही. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेना (शिंदे गट) जनतेच्या सोबत उभी आहे. आम्ही १०० टक्के समाजकारण करणारे, बाळासाहेब आणि शिंदे यांचे शिवसैनिक आहोत. सत्तेत राहून सत्तेचा गैरवापर करणारे नाही, तर सत्तेचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करणे हेच आमचे ध्येय आहे.
मालवणमधील कमलाकर खोत यांच्या जुन्या मीटरमध्ये बिघाड झाल्याने आणि युनिटची आकारणी योग्य होत नसल्याने त्यांच्या मागणीनुसार मीटर बदलण्याची कारवाई करण्यात आली. शासनाच्या नियमांनुसारच ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवला असताना, तो जबरदस्तीने बसवला असे सांगून खोत यांनी उपोषण सुरू केले, असे पाटकर यांनी स्पष्ट केले. महावितरणने उपोषण करू नये, यासाठी १२ ऑगस्ट रोजी खोत यांना पत्रही दिले होते. तरीही त्यांनी उपोषण केले. त्यावेळी शिवसेनेच्या वतीनेही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना आपले सरकार महायुतीचे आहे, आपले पालकमंत्री आणि आमदार आपले आहेत, त्यामुळे तुम्हाला निश्चित न्याय मिळेल. असेही सांगण्यात आले होते. सध्या खोत यांच्या स्मार्ट मीटरच्या बाजूला दुसरा मीटर बसवण्यात आला आहे. दोन्ही मीटरचे युनिट रिडिंग एक महिना तपासले जाईल. स्मार्ट मीटरचे रिडिंग योग्य आढळल्यास तो कायम ठेवला जाईल, अन्यथा तो बदलला जाईल, असे वीज वितरणने सांगितले आहे. कोणावरही जबरदस्ती होणार नाही, हेच पालकमंत्री आणि आमदारांचे धोरण असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
यावेळी पाटकर यांनी महसूल विभागावर होत असलेल्या टीकेलाही उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे एक सक्षम मंत्री आहेत आणि मालवण महसूल विभागातही चांगले काम सुरू आहे. जनहिताचे दाखले वेळेवर दिले जातात. आमदार निलेश राणे सातत्याने संपर्क साधून दाखले आणि तत्पर सेवेसाठी सूचना देतात. १५ दिवसांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांसोबतही त्यांची चर्चा झाली, त्यामुळे आता दाखले प्रलंबित नाहीत. टीका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, असेही पाटकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!