*कोंकण एक्सप्रेस*
*संस्कृतभारती तर्फे संस्कृतदिन उत्साहात संपन्न*
*कणकवली : प्रतिनिधी*
येथे उत्कर्षा उपाहारगृहच्या वरच्या मजल्यावर संस्कृतदिनाचे आयोजन संस्कृतभारती सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून सौ. एस्. सी. गरगटे मॅडम (संस्कृताध्यापिका, एस्. एम्. हायस्कूल, कणकवली) लाभल्या होत्या. नाटळ हायस्कूलचे निवृत्त संस्कृताध्यापक श्री. अरूण वळंजू हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते. नरडवे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक तसेच संस्कृतभारतीचे रत्नागिरी विभाग संयोजक सन्मा. श्री. मनोहर काजरेकर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार हा संस्कृतभारती या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व बालकेंद्र कणकवलीच्या संस्कृत प्रेमी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात संस्कृत गीते, स्तोत्रे, कथाकथन, संस्कृतसंभाषणे, संस्कृत गीतांवर कथ्थक नृत्ये, संस्कृत भाषेमधून मनोगते इ. चे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमावेळी बालकेंद्र कणकवलीच्या अध्यापिका सौ. मैथिली पिळणकर व सर्व मान्यवर यांनी संस्कृतभारती तर्फे घेण्यात आलेल्या संस्कृत परीक्षेमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण केले.
संस्कृत भाषा ही प्रत्येक भारतीयाची शान असून तिचा आपणं योग्य तो मान राखला पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शिका सौ. एस्. सी. गरगटे यांनी याप्रसंगी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. मनोहर काजरेकर यांनी विद्यार्थ्यांनी संस्कृत संभाषण करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरा मेस्त्री व कु. नव्या वारंग या माध्यमिक विद्यामंदिर कनेडी च्या विद्यार्थिनींनी केले. कनेडी हायस्कूलचे संस्कृताध्यापक व संस्कृतभारती सिंधुदुर्गचे प्रसारप्रमुख श्री. मकरंद आपटे यांनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले. नाटळ हायस्कूलचे निवृत्त संस्कृताध्यापक सन्मा. श्री. अरुण वळंजू यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला ख्यातनाम साहित्यिक कै. विद्याधर करंदीकर यांचे पुत्र डॉ. विनायक करंदीकर, त्यांची पत्नी सौ. प्रसादिनी करंदीकर व आई श्रीम. वैजयंती करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.