*कोंकण एक्स्प्रेस*
*लढा तीव्र करण्यासाठी मानवी साखळीतून संकल्प*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
पोलिस अधिक्षक मोहन दहीकर व अतिरिक्त पोलिस अधिक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेनुसार वेंगुर्ला पोलिस ठाण्यातर्फे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी एक किलोमिटर एवढ्या अंतरापर्यंत मानवी साखळी तयार करून अंमली पदार्थ विरोधी लढा अधिक तीव्र करण्याचा संकल्प केला.
हा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, महिला हेड कॉन्स्टेबल अनुराधा देसाई, महिला कॉन्स्टेबल तुलशी कोंबे, पोलिस कॉन्स्टेबल सागर चौगुले, मुख्याध्यापक सचिन बिडकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ म्हणजे काय? त्याचे मानवाच्या शरीरावर व मनावर होणारे दुष्परिणाम? अंमली पदार्थाचे स्वरूप? अंमली पदार्थाचे कायदे याबाबत माहिती दिली. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना अमली पदार्थविरूद्ध पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या लोक चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. दरम्यान, निसर्ग ओतारी यांनी स्वतः लिहिलेली ‘व्यसन‘ नावाची कविता मुलांना ऐकवली. याच कार्यक्रमात शाळेच्या कबड्डी टीमने तालुका स्पर्धेमध्ये यश मिळवून जिल्हा स्पर्धेमध्ये प्रवेश केला त्याबाबत या टीमचे पोलिस निरीक्षक ओतारी यांनी अभिनंदन केले.