*कोंकण एक्सप्रेस*
*गावठी आंब्याची अवीट गोडी कायम राहणार – कृषि अभ्यासक चंद्रशेखर सावंत*
*दोडामार्ग – शुभम गवस*
तालुक्यातील केर – भेकुर्ली ग्रामपंचायतने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत जुन्या व काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या जुन्या गावठी पारंपरिक आंब्याचे वाण टिकविणे हा एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. आज ग्रामपंचायत मार्फत विशेष तज्ञ व्यक्तींमार्फत कलम बांधणी कार्यशाळा देखील संपन्न केली आहे. त्यामुळे केर – भेकुर्ली ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उपस्थितानी या उपक्रमाचे कौतुक केले.
याबाबत माहिती अशी की, विशेष म्हणजे जे आंबे कोकणात रायत्यासाठी वापरले जातात ती झाडे आता जीर्ण होत चालली असून काही जाती नामशेष होत आहेत त्यामुळे या जाती टिकून राहाव्यात यासाठी गावठी आंबे कलम बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला आज मंगळवारी चव्हाटा मंदिर केर येथे कृषी अभ्यासक चंद्रशेखर सावंत, रोपवाटिका अभ्यासक सुनील देसाई, कलमतज्ञ महेंद्र मोरजकर, कृषि अधिकारी श्री. खडपकर यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कलम बांधणी वाढ, संगोपन याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कलमतज्ञ महेंद्र मोरजकर यांनी स्वतः कलम बांधून दिले शिवाय शेतकऱ्यांकडून बांधूनही घेतली. यावेळी सरपंच रुक्मिणी मुकुंद नाईक, उपसरपंच तेजस तुकाराम देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील यांसह जेष्ठ नागरिक, शेतकरी आदी उपस्थित होते.
केर गावात हे असे प्रचंड विस्तारलेले शेकडो वर्षापूर्वीचे गावठी आंब्याचे वृक्ष आहे. आता हातावर मोजण्या एवढेच वृक्ष शिल्लक आहेत. पूर्वी मिशयाळा आंबा, मोडका आंबा असे अनेक आंबा वृक्ष होते. ज्यांची आंबाडी चवदार, रसाळ होती. मात्र काळाच्या ओघात जीर्ण होऊन झाडे नष्ट झाली आणि ते आंबे आठवणीतच राहिले. मात्र आता शिल्लक आंब्याच्या प्रजाती टिकावीत यासाठी पारंपारिक वाण कलम राबवण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. तसेच केर गाव हा एकसंघ आणि ग्रामपंचायत जल, जंगल, जमिन यावर काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपणाला माहिती आहेच आपल्याही गावात जुने आंबे जीर्ण होऊन जात संपली आणि कलमी आंबे बाजारात आले आता आपले ‘गावठी आंबे’ कलमाच्या बांधणीतून आपली पारंपारिक ओळख टिकून खवय्यांना अविट गोडी देणार आहेत.