*कोंकण एक्स्प्रेस*
*सैनिकांसाठी प्रेमाचा धागा – पोंभुर्लेच्या विद्यार्थ्यांकडून विशेष रक्षाबंधन*
*कासार्डे : संजय भोसले*
देवगड तालुक्यातील जि. प. केंद्र शाळा, पोंभुर्ले क्र.-१ येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी
रक्षाबंधनाचा उत्सव खास पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सुंदर राख्या बनवून त्या CRPF कॅम्प (श्रीनगर, जम्मू-काश्मीर), नॅशनल डिफेन्स अकॅडमी (खडकवासला, पुणे) तसेच इंडियन आर्मी कॅम्प, अहमदाबाद (गुजरात) येथे पोस्टाने सैनिकांना पाठवल्या.
रक्षाबंधनामधील संकल्पना ही ‘राखी ही केवळ बहिणीने भावाच्या हाती बांधावी एवढ्यावरच मर्यादित न ठेवता ती देशाच्या सीमेवर देशातील नागरिकांच्या रक्षणार्थ प्राण तळहातावर घेऊन सतत जागृत राहणाऱ्या देशाचे परक्यांच्या आक्रमणापासून रक्षण करणाऱ्या, प्रसंगी हातातली पत्करण्यास तत्पर असणाऱ्या शूर वीरांच्या हाती बांधून त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला प्रेमाच्या ओवाळणीने ऋणानुबंधीत करण्याच्या उदात्ततेपर्यंत नेण्याची स्तुत्य कृती जि. प. केंद्र शाळा, पोंभुर्ले क्रमांक -१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी या प्रेमाच्या राख्या सैनिकांच्या मनगटावर पोहोचल्या. जवानांनी आनंदाने त्या बांधून विद्यार्थ्यांना व्हॉट्सॶॅपवर फोटो व आभार संदेश पाठवले.
तसेच पोंभुर्ले गावातील इतर देऊळवाडी, साखरवाडी, बागबौध्दवाडी इत्यादी भाग शाळांना देखील राख्या पाठविल्या.
ही आगळीवेगळी संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सोनाली पाटील यांनी मांडली. त्यांना श्री. धनगर सर, राठोड सर आणि जवळे सर यांनी सहकार्य केले. ‘सीमेवर असो वा गावात, भावबंध आणि देशप्रेमाचा धागा कायम हृदयांना जोडत रहावा.’ असा संदेश देणाऱ्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.