*कोंकण एक्सप्रेस*
*लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी…*
बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin) जाहीर झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. आज पुन्हा एकदा एक वर्षानंतरही चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांसाठी दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली त्यानंतर एकच गदारोळ झाला. महायुतीसाठी ही योजना फायदेशीर ठरली असली तरी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन या योजनेला विरोध दर्शविला होता.
मात्र तरीही राज्यातील केवळ कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, त्यापैकी २ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आणि त्यांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होतात. मात्र आता लाडकी बहिण योजनेअंतर्गत मोठी माहिती समोर येत आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण गेल्या 5 महिन्यांत या योजनेसाठी एकही नवा अर्ज आलेला नाही. त्यामुळे विविध चर्चाना उधाण आलं आहे.
महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने ‘माझी लाडकी बहिण’ (Ladki Bahin) योजना जाहीर केली आणि तिच्या प्रभावी अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवले. याचिकेचे निकाल विधानसभा निवडणुकीत दिसून आले. ना भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु, त्यानंतर या योजनेची छाननी केल्यानंतर लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले.
फक्त, आता याच लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का, अशी कुजबुज सुरू झाली आहे. येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्याचे १५०० रुपये प्रति महिना मानधन पात्र उमेदवारांना वाटले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देते. या आर्थिक मदतीचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे. सध्या लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. महिलांचे हक्क आणि त्यांची आर्थिक सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. या योजनेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असे ते म्हणाले.
“आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांच्या मदतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही,” असे ते पुढे म्हणाले, अशाप्रकारे, महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की ‘लाडकी बहिण योजना’ ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे एक कायमस्वरूपी पाऊल आहे आणि त्याचे फायदे पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील.