*कोंकण एक्सप्रेस*
*अधिकृत रित्या राष्ट्रीय महामार्ग बांदा-संकेश्वर मार्गाचे लवकरच “काँक्रिटीकरण”*
*आमदार दीपक केसरकर यांची माहिती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
नागरिकांच्या मागणीनुसार बांदा-संकेश्वर महामार्ग हा सावंतवाडी शहरातूनच नेण्यात आला आहे. त्यासाठी ३६ कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले. नुकताच तो अधिकृत रित्या राष्ट्रीय महामार्ग कडे वर्ग करण्यात आला, आता दुसऱ्या टप्प्यात त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान दोडामार्ग येथे स्थिरावलेले हत्ती वनतारा मध्ये पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने संबंधित पथक या ठिकाणी नुकतेच येऊन गेले तसेच गवे आणि माकड यांच्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी संजू परब उपस्थित होते. त्यावेळी केसरकर म्हणाले, लोकांच्या मागणीनुसार बांदा-संकेश्वर हा महामार्ग आम्ही सावंतवाडी शहरातून नेला आहे. त्यानंतर तो महामार्ग राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे वर्ग करण्यात आला तसेच त्यासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे आता हा महामार्ग व्यवस्थित झाला आहे. पहिल्या टप्प्यात डांबरीकरण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात या महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येईल, असे ते म्हणाले. तालुक्यासह मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गवे आणि माकडांचे प्रमाण वाढले आहे. सगळ्यांच्या धडकेमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे गव्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात येईल. त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या हत्तींना पकडून वनातारामध्ये नेण्यासंदर्भात आमची बोलणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वनताराच्या अधिकाऱ्यांचे पथक त्या ठिकाणी पाहणी करून गेले. मात्र पावसाळा असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या. मात्र लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे केसरकर म्हणाले.