*कोंकण एक्सप्रेस*
*जि. प. प्राथ. शाळा, सासोली नं. 1 प्रशालेत “रानभाज्यांच्या आठवडी बाजाराचे “आयोजन*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
कोकणामध्ये मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या पावसाळी रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावे, यासाठी आज दि. 13/08/2025 रोजी जि. प. प्राथ. शाळा, सासोली नं. 1 ता. दोडामार्ग या प्रशालेत “रानभाज्यांच्या “आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. सासोली बाजारवाडीतील बस स्टॉप जवळील मोकळ्या जागेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी टाकळा, अळू, कुर्डू, शेवगा, चुरणपाला, वालीचा पाला, निरफणस, केळी, केळबोण्ड, काकडी, दोडकी, कारली, केरली भाजी इ. विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या आठवडी बाजारासाठी पालक, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या बाजाराचं आयोजन करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मनोज गवस, उपाध्यक्षा श्रीम. संजना परब, सासोली उपसरपंच श्री. अनिरुद्ध फाटक,ग्रा. पं. सदस्य श्री. गुरूदास सावंत श्रीम. अनुष्का गवस, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. कविता परब, पदवीधर शिक्षक श्री. दयानंद नाईक, उपशिक्षक श्री. दत्तप्रसाद देसाई, श्री. हेमंत सावंत यांनी सहकार्य केले.
या आठवडी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी जवळपास साडेतीन -चार हजाराची भाजी विक्री केली. उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच दरवर्षी अश्याच आठवडी बाजाराचं आयोजन करावं, असं मनोगत व्यक्त केलं.