*कोंकण एक्सप्रेस*
*तब्बल ५३ वर्षांची नाट्यनिर्मितीची यशस्वी परंपरा !*
*कोकण सुपुत्र अष्टविनायकचे दिलीप जाधव यांना ‘नटवर्य केशवराव दाते’ पुरस्कार*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
रंगभूमीवर उल्लेखनीय आणि सर्वोच्च योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे, नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील बामनोली (तालुका संगमेश्वर) येथील ‘अष्टविनायक’ या नावाजलेल्या नाट्यनिर्मिती संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव यांना ज्येष्ठ साहित्यिका आणि संस्थेच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्षा सौ. मोनिका गजेंद्र गडकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
‘रंगभूमी हीच कर्मभूमी’ मानत गेली ५३ वर्षे दिलीप जाधव यांनी मराठी रंगभूमीची अविरत सेवा केली आहे. त्यांच्या नाट्य क्षेत्रातील भरीव आणि प्रेरणादायी योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखंड नाट्यसृष्टीमध्ये प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यशस्वीपणे करून विद्यार्थी आणि तरुणांना मोबाईलच्या अतिरेकी गैरवापरापासून परावृत्त करण्याचा यशस्वी प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजेच सुप्रसिद्ध नाट्यनिर्माते दिलीप जाधव ! श्री. जाधव यांच्या नेतृत्वाखाली अष्टविनायक संस्थेने गालिब, मर्डरवाले कुलकर्णी, संज्या छाया, आज्जीबाई जोरात, जाऊबाई जोरात, गंगुबाई नॉनमॅट्रिक यांसारखी अनेक दर्जेदार आणि सामाजिक आशय असलेली नाटके सादर केली आहेत.
यासारख्या आणि अनेक नाट्यकृतींमधून अष्टविनायक संस्थेने मराठी रंगभूमीवर सामाजिक जाणीव, साहित्यिक समृद्धता आणि कलात्मकता यांचे प्रभावी दर्शन घडवले आहे. श्री. दिलीप जाधव यांचे नेतृत्व आणि समर्पण यामुळे ही संस्था आज मराठी नाट्यविश्वात एक मानद स्थान प्राप्त करत आहे.
पुरस्कार स्वीकारताना दिलीप जाधव यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले, “गेली ५३ वर्षे रंगभूमीची अविरत सेवा सुरू आहे. आतापर्यंत अनेक नाटकांना महाराष्ट्र शासन, झी गौरव, म.टा. सन्मान, आर्यन सन्मान यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ हे विशेष महत्त्वाचे स्थान राखतो.”
ते पुढे म्हणाले, “माझ्यासाठी हा अत्यंत आनंददायी क्षण आहे. गेल्या ५३ वर्षांत मला ज्यांच्याकडून या रंगभूमीबद्दल थोडे शिकता आले, अशा नाट्य निर्मिती संस्था, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, पडद्यामागील मंडळी, असंख्य मित्र आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय व त्यांची निवड समिती — या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. आजवरच्या माझ्या कामाची दखल घेत हा महत्त्वाचा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. यापुढेही माझ्याकडून रंगभूमीची सेवा अविरतपणे होत राहील, हेच वचन देतो.”