*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुक्यातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टीदोष व वाचदोष तपासणी शिबिरे संपन्न*
*मालवण : प्रतिनिधी*
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) २०२५’ अंतर्गत मालवण तालुक्यात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. पंचायत समिती, शिक्षण विभाग, मालवण आणि RBSK ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय दृष्टीदोष आणि वाचदोष तपासणी शिबिराचे आयोजन मालवण येथे करण्यात आले होते.
या शिबिराचा मुख्य उद्देश तालुक्यातील दृष्टीदोष किंवा वाचदोष असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देणे हा होता. या तपासणी शिबिरात RBSK च्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. तसेच, शिक्षण विभागातील विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शैक्षणिक मदत कशी करता येईल, याबाबत पालकांना मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या तपासणीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी लवकर लक्षात आल्या आणि त्यांच्यासाठी विशेष शिक्षण पद्धतीची शिफारस करण्यात आली.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये समावेशक शिक्षणावर (Inclusive Education) विशेष भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. अशा शिबिरामुळे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या यशस्वी उपक्रमाध्ये मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने, विषय तज्ज्ञ आरती कांबळी, गौरी नार्वेकर, विशेष तज्ज्ञ विकास रुपनर, स्वप्नील पाटणे, व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच RBSK ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. बालाजी पाटील, डोळ्यांचे डॉक्टर, स्पीच थेरेपिस्ट श्री. पवार, ढोके मॅडम, कोमल मॅडम आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.