*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट येथे साडेआठ हजाराचा गुटखा जप्त : एकावर गुन्हा दाखल*
*कणकवली : प्रतिनिधी*
तालुक्यातील फोंडाघाट येथे घरात साठवलेला साडे आठ हजार रूपये किंमतीचा गुटखा कणकवली पोलिसांनी जप्त केला. यात अवैध गुटखा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी फोंडाघाट येथील नागेश गणपत कोरगावकर (४३, फोंडाघाट हवेलीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली.
फोंडाघाट येथे विक्री आणि साठवणुकीस बंदी असलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हवालदार सुभाष शिवगण, हवालदार पांडुरंग पांढरे, पोलीस स्वप्नील ठोंबरे, अस्मिता कारंडे आदींनी नागेश कोरगावकर याच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी घराच्या पडवीमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. यात आरएमडी, विमल आणि अन्य गुटखा कंपन्यांचा असा मिळून ८ हजार ४९० रूपये किंमतीचा गुटखा आढळून आला. हा सर्व साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
गुटखा पदार्थाचे सेवन करणे असुरक्षित आहे याची माहिती आणि जाणीव असताना देखील गुटखा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी नागेश कोरगावकर याच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अधिक तपास हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.