*कोंकण एक्सप्रेस*
*गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील सीएनजी पुरवठा सुरळीत ठेवा*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*
*तळेरे : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव काळामध्ये वाहनांसाठी सीएनजी गॅसची मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळामध्ये वाहनांसाठी लागणारा सीएनजी गॅसपुरवठा अखंडित ठेवण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. मुंबईहून चाकरमानी मंडळी यासाठी कोकणात खासगी वाहनाने दाखल होतात. या काळात सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा भासतो. यासाठीच गणेशोत्सवात सीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आपल्या स्तरावरून पुरवठा विभागाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दरवर्षी ऐन गणेशोत्सव काळात रिक्षा चालकांनाही सीएनजी पंपावर गॅसचा तुटवडा भासत असल्याने मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. गणेशोत्सवामध्ये रिक्षा व्यावसायिकांचा चांगला व्यवसाय करण्याची संधी मिळते. परंतु सीएनजी गॅसचा अपुरा होणारा पुरवठा यामुळे सीएनजी गॅस संपल्यानंतर पुन्हा गॅस उपलब्ध होईपर्यंत चार-पाच तास रांगेमध्ये रिक्षा चालक व खासगी वाहनधारकांना थांबावे लागते. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो तसेच प्रवास सुखकर व वेळेत होत नाही. याकरिता जिल्हयातील सर्व सीएनजी पंपांवर गॅसचा मुबलक आणि अखंडित पुरवठा होईल, याची योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघातर्फे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित नसल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांच्याजवळ लेखी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, कणकवली तालुका सदस्य अक्षय शेडेकर उपस्थित होते.