*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात मटका, जुगार, ड्रग्जला सत्ताधाऱ्यांचे अभय : परशूराम उपरकर*
*निधी नाही तर रस्ते खड्डेमुक्त होणार कसे…?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, ड्रग्ज, गांजा आणि अवैध दारू विक्री जोरात सुरू असून या सर्व अनैतिक धंद्यांना
सत्ताधाऱ्यांचे अभय आहे,” असा गंभीर आरोप माजी आमदार आणि शिवसेना नेते परशूराम उपरकर यांनी आज केला. तसेच सर्व रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे. पण जिल्ह्यातील ठेकेदारांचे पाचशे कोटी रूपये देण्यासाठी शासनाकडे निधीच नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात खड्ड्यांची समस्याही जैसे थे राहणार असल्याची टीकाही त्यांनी केली. येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्गात फक्त काही दिवसापुरताच मटका, जुगार बंद झाला. आता खुद्द सत्ताधाऱ्यांच्याच आशीर्वादामुळे सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू झाले आहेत. गांजाही उपलब्ध होऊ लागला आहे.
ते म्हणाले, सिंधुदुर्गातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण जिल्ह्यातील ठेकेदारांची पाचशे कोटींची येणे अद्याप बाकी आहे. जर ठेकेदारांना निधीच मिळणार नसेल तर जिल्ह्यातील खड्डे कसे? बुजवले जाणार, खड्डे बुजविण्याच्या नावे केवळ सिंधुदुर्गवासीयांची दिशाभूल सुरू आहे. श्री. उपरकर यांनी शासनाच्या “आनंदाचा शिथा” योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गणेश चतुर्थीला मिळणाऱ्या आनंदाचा शिधा अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. या पॅकमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून लोकांची दिशाभूल केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडताच ‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्याचा डाव सत्ताधारी खेळत आहेत,
ते पुढे म्हणाले, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची स्थिती अत्यंत खराब आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पेवर ब्लॉक टाकून खड्डे बुजवले जात आहेत. तरीही खड्ड्यांची समस्या कायम असून त्याचा गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. गेले पंधरा वर्षे महामार्ग पूर्णत्वास जात नाही ही खरी शोकांतिका आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या स्थितीवरही श्री. उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली. “पालकमंत्री ८७ डॉक्टरांची भरती झाल्याचे सांगतात, मात्र यातील बहुतांश डॉक्टर हे शिकाऊ असून त्यांच्यावर जनतेचा जीव सोपवावा का, हा प्रश्नच आहे, दरम्यान रो-रो सेवा असो की बोटींमार्फत कार वाहतूक सुविधा याचा लाभ थोडक्या लोकांनाच होत आहे. मात्र सिंधुदुर्गातील जनतेचे खरे प्रश्न अजूनही तितक्याच तीव्रतेने प्रलंबित आहेत, असेही श्री. उपरकर म्हणाले.