*कोंकण एक्सप्रेस*
*रूग्णालयातील आरोग्य यंत्रणा सुरळीत न झाल्यास १५ पासून आंदोलन ; सुदीप कांबळे*
*सत्यशोधक फ्रंटचे सुदीप कांबळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी केली चर्चा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांकडून रूग्णांना वेळेवर आणि चांगली सेवा मिळायलाच हवी. इथली आरोग्य यंत्रणा आठ दिवसांत सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रूग्णालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सत्यशोधक सेक्युलर फ्रंटचे अध्यक्ष अॅड. सुदीप कांबळे यांनी आज दिला.
कणकवली उपजिल्हा रूग्णालयातील समस्यांबाबत अॅड. कांबळे यांनी आज जिल्हा रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. सचिन डोंगरे, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे, फ्रंटचे संघटक सचिन कासले आदी उपस्थित होते.
सुदीप कांबळे म्हणाले की, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था बिघडली आहे. याठिकाणी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना ओरोस जिल्हा रूग्णालयात पाठवले जाते. तेथून गोवा येथे रेफर केले जाते. वस्तुतः उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नव्याने काही डॉक्टर रूजू झाले आहेत. मात्र अनेक डॉक्टर रजेवर असतात. ते सर्व डॉक्टर रूग्णसेवेसाठी उपलब्ध ठेवावेत, उपजिल्हा रूग्णालयात सीटी स्कॅन, सोनोग्राफीची सुविधा आहे. पण
अजूनही रेडिओलॉजिस्ट उपलब्ध झालेला नाही. याखेरीज रुग्णालयात मिनी रक्तपेढी उपलब्ध व्हावी, बाल रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष हवा यासह अन्य मागण्या सुदीप कांबळे यांनी डॉ. इंगळे यांच्यासमोर केल्या.
डॉ. इंगळे यांनी सर्व मुख्यांवर सुदीप कांबळे यांच्याशी चर्चा केली. यात १४ ऑगस्ट पर्यंत डॉक्टरांची उपलब्धता तसेच अन्य मुद्द्यांवर उपाययोजना केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी अॅड. कांबळे यांनी हाडांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर वेगळीच उपचार होत नाहीत, याचे नेमके कारण काय असा सवाल केला. तर रुग्णालयात दोन आथो स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. मात्र, नियोजनाअभावी रुग्णांवर उपचार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापुढील काळात हाडांच्या रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे डॉ इंगळे यांनी सांगितले.
रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत ही परिस्थिती आहे. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात रेडिओलॉजिस्ट डॉ. रुपेश जाधव आहेत. उपजिल्हा रुग्णालयात आठवडयातून तीन दिवस याठिकाणी रुग्णांची तपासणी करण्यासाठी पाठविण्याचे नियोजन करू, असे डॉ. इंगळे सांगितले. रुग्णालयात मिनी रक्तपेढी आहे. या पुढील काळात रक्तपेढीत किती रक्तसाठा आहे, त्याची माहिती डॅशबोर्डवर लावली जाईल. एनआरएचएममधून नियुक्त केलेले व करारपद्धतीवर घेतलेल्या डॉक्टरांना ओपीडीसाठी वेळ निश्चित करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयात नियुक्त केलेले व करारपद्धतीवर घेतलेल्या डॉक्टरांना लिस्ट लावली जाईल. रुग्णालयात ज्या-ज्या आरोग्य विषयक समस्या व तांत्रिक बाबी असतील त्या सोडविण्यात येतील अशीही ग्वाही डॉ. इंगळे यांनी दिली.