खालिद का शिवाजी चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत

खालिद का शिवाजी चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत

*कोंकण एक्सप्रेस*

*खालिद का शिवाजी चित्रपटातील असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकावीत*

*मालवणातील सकल हिंदू समाजाची मागणी*

*मालवण (प्रतिनिधी)*

‘खालिद का शिवाजी’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवली असल्याचे स्पष्ट होते. ट्रेलरमधेच जर इतक्या स्वरूपात भ्रामक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, तर संपूर्ण चित्रपटात आणखीन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या, विकृत आणि असत्य गोष्टी असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे समाजात विशषेतः विद्यार्थी आणि तरुणपिढी यांमध्ये भ्रामक माहिती पसरवली जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील सर्व असत्य आणि भ्रामक दृश्ये काढून टाकण्यात यावीत, तसे न झाल्यास चित्रपट प्रदर्शीत होऊ देऊ नये, अशी मागणी मालवण येथील सकल हिंदु समाजाने मालवण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करत शासनाकडे केली आहे.

श्री शिवशंभू विचार मंच, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, शिवराज मंच, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, सनातन संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांसह हिंदू बांधवांतर्फे अजित आचरेकर यांच्या हस्ते मालवणचे नायब तहसीलदार विनायक जांभेकर व पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अजित आचरेकर, भाऊ सामंत, ऍड. समीर गवाणकर, ऍड. हेमेंद्र गोवेकर अनिकेत फाटक, गणेश चव्हाण, समीर शिंदे, सौ. शिल्पा खोत, भाई मांजरेकर, प्रसाद भोजने, यशवंत सतजोशी, मंदार सरजोशी, सौ. सेजल परब, सन्मेष परब, ऐश्वर्य मांजरेकर, शांती तोंडवळकर, राजाराम हळदणकर, स्वप्नील घाडी, मुकुंद घाडी, प्रवीण पारकर, विवेक परब, उमेश परुळेकर, कुणाल आंगणे, चिंतामणी सामंत, गणेश मेस्त्री, हरेश पडते आदी व इतर उपस्थित होते.

खालिद का शिवाजी या चित्रपटाचे ट्रेलर बघितल्यानंतर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्ये अतिशय चुकीच्या रीतीने मोडून तोडून दाखविलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५% मुसलमान होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर एक मशीद बांधली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये ११ मुसलमान होते, असे दावे या चित्रपटात केले गेले आहेत. हे दावे कोणत्याही इतिहासकारांकडून तपासून घेतलेले नाहीत किंवा या गोष्टी कोणत्याही समकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये प्रमाण स्वरूपात आढळत नाहीत. या असत्य गोष्टींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती समाजात पसरवली जात आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहचवणारी आहे. यामुळे समाजात तसेच इतिहासकारांमध्ये भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

ही जी काही विकृत स्वरूपाची माध्यमे आहेत जी अशा प्रकारच्या गोष्टी समाजात पसरविण्यामध्ये कुप्रसिद्ध आहेत आणि ही गोष्ट अत्यंत खेदजनक आणि निराशाजनक आहे. त्यामुळे समकालीन ऐतिहासिक पुरावे व कागदपत्रे तपासून या चित्रपटाची समीक्षा केली जावी, सत्यता तपासली जावी. यामधील सर्व असत्य व भ्रामक दृश्ये काढून टाकण्यात यावीत आणि भविष्यात जर यापुढे कोणी अशा प्रकारच्या गोष्टी करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर तत्काळ बंदी घातली जावी. अशा प्रकारच्या गोष्टीमुळे मालवण सारख्या ऐतिहासिक शहरात वाद तसेच कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे म्हणून ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!