*कोंकण एक्सप्रेस*
*धनंजय मुंडेंना बसणार मोठा दणका? मालमत्ता जप्त होणार?*
बीडच्या माजलगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सरकारी वकिलांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज बीडच्या विशेष मोक्का (MCOCA) न्यायालयात दाखल केला आहे. आज यावर कोर्टाकडून महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
धनंजय मुंडेंना मोठा दणका बसण्याची शक्यता
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात असलेल्या जमिनीच्या भागीदारीचे काही कागदपत्रे पोस्ट केले होते. त्यामुळे जर आता न्यायालयाने वाल्मीक कराडच्या इतर संपत्तीसह या एकत्रित मालमत्तेवरही जप्तीचे आदेश दिले, तर धनंजय मुंडे यांना मोठा दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जप्तीमुळे त्यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान ठरु शकते. या शक्यतेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
वाल्मीक कराडवर आर्थिक निर्बंध येण्याची शक्यता
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या कायद्यानुसार, गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. जेणेकरून गुन्हेगारी कृत्यांना आळा घालता येईल. सरकारी पक्षाचा अर्ज याच तरतुदीवर आधारित आहे. जर न्यायालयाने सरकारी वकिलांचा अर्ज मान्य केला, तर वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांवर आर्थिक निर्बंध येण्याची शक्यता आहे.