*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गातून १ लाख राख्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार : प्रभाकर सावंत*
*”रक्षाबंधन” अभियानाच्या माध्यमातून भाजपाचा उपक्रम…*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील तमाम भगिनींकडून १ लाख राख्या आणि शुभसंदेश पाठवण्याचे अभियान भाजपने हाती घेतले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही १ लाख राख्या आणि शुभसंदेश पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९२१ बुथवरून प्रत्येकी किमान १०० याप्रमाणे एकूण १ लाख राख्यांचे लिफाफे प्रदेश कार्यालयात पाठवले जाणार आहेत. ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान हे अभियान सुरू राहणार असून, त्यानंतर एका विशेष कार्यक्रमात सर्व राख्या मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केल्या जातील असे यावेळी सावंत यांनी सांगितले. या अभिनव अभियानासाठी जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय व मंडलस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आणि जिल्हा सरचिटणीस संदीप साटम हे या अभियानाचे जिल्हा संयोजक म्हणून काम पाहतील.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला भगिनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मुख्यमंत्र्यांना राखी आणि शुभसंदेश पाठवतील, अशी अपेक्षा आहे.
यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून घरोघरी एक विशेष लिफाफा देण्यात येणार आहे. यामध्ये महिलांनी आपली राखी, दोरा आणि दोन ओर्डीचा शुभसंदेश लिहून तो कार्यकर्त्यांकडे जमा करायचा आहे. ज्या महिलांपर्यंत कार्यकर्ते पोहोचू शकणार नाहीत, त्यांनी आपल्या तालुक्यातील भाजप कार्यालयात राखी जमा करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. जागतिक विक्रम नोंदवल्यानंतर आणखी एक महत्त्वाकांक्षी अभियान
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात एकाच दिवशी विक्रमी रक्त संकलन करून जागतिक स्तरावर नोंद करण्यात आली होती. त्याच धर्तीवर हे अभियानही यशस्वी होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.