देवगड किल्ल्यावर मैत्रीचा अविस्मरणीय सोहळा

देवगड किल्ल्यावर मैत्रीचा अविस्मरणीय सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड किल्ल्यावर मैत्रीचा अविस्मरणीय सोहळा*

*तीस वर्षांनी जुनी मैत्री पुन्हा फुलली*

*स. ह. केळकर महाविद्यालयाच्या १९९५ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयातून सन १९९५ मध्ये पदवी संपादन केलेली मित्रमंडळी तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली – तेही ऐतिहासिक देवगड किल्ल्यावर! जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा गेट-टुगेदर रविवारी उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
या गडावरील श्री गणपती मंदिरातील श्रीची पुजा करून दर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गडाच्या निसर्गरम्य वातावरणात मैत्रीच्या नात्यांला नवी संजीवनी मिळाली .
पत्रकार राजेंद्र साटम यांनी स्वपरिचय देत कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या प्रस्तावनेतून कॉलेज जीवनाचे भावस्पर्शी चित्र उभे राहिले. त्याच भावनांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या स्वरचित कवितेने मैत्रीचा धागा अधिकच मजबूत झाला.
तब्बल तीस वर्षांनंतर अनेकजण प्रत्यक्ष भेटत होते. काही ओळखी नव्याने जुळल्या, काही आठवणी नव्याने उलगडल्या. ओळखपरेड, कॉलेजचे किस्से, गप्पा, हास्यविनोद, फोटोशूट, या साऱ्यांनी वातावरणात आनंदाची रंगत निर्माण केली. या गप्पांमधून वेळ कसा निघून गेला हे कुणालाच कळले नाही.
यानंतर सर्वांनी एकत्रित अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
देवगड किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारे अथांग समुद्रसौंदर्य, गार वाऱ्याची झुळूक, आणि निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेली ही भेट – मैत्रीचे हे क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरले.
ही भेट केवळ स्नेहमेळावा नव्हता, तर आठवणींचा अमूल्य ठेवा होता. हे क्षण हृदयात साठवून नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा एकत्र भेटण्याचा निर्धार करत सर्वजण उत्साहात घरी परतले.
या गेट-टुगेदरचे यशस्वी आयोजन ग्रुप अ‍ॅडमिन हेमांगी तारी हिने केले. याबद्दल तिचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या पुढाकाराचे सर्वांनी मनःपूर्वक कौतुक केले.
या स्नेह मेळाव्यात हेमांगी तारी, सुजाता घाडी, सुप्रिया मुणगेकर, सीमा परब, जया भाबल, राजू धुरी, राजेश कणेरकर, राजेश चव्हाण, अनिल गुरव, महेश भाबल, महेश घाडी, राजेंद्र साटम हे सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!