*कोंकण एक्सप्रेस*
*मुलामुलींनी स्वतः सक्षम व्हा..! – प्रज्ञा परब*
*वेतोरे हायस्कूलमध्ये ‘सक्षम तू‘ कार्यक्रम संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*
समाजातील नविन पिढी हिच भारताची भावी आधारस्तंभ आहे. अत्याचाराशी सामना करताना मुलामुलींनी स्वतः सक्षम होणे गरजेचे आहे. तरच भारतदेश सक्षम बनेल. आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना नवनविन निर्माण झालेल्या सुखसोयींचा योग्य तो वापर नव्या पिढीने करावा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब यांनी विद्यार्थ्यांना केले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व महिला प्रदेश अध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्व जिह्यांमध्ये ‘सक्षम तू‘ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यातील या कार्यक्रमाची सुरूवात वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे येथील श्री सातेरी हायस्कूलमधून करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, जिल्हा सदस्य साधना शिरोडकर, दामिनी पथकाच्या प्रमुख दिपिका मठकर, वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे वाहतूक पोलिस मनोज परूळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस वेंगुर्ला युवा अध्यक्ष गजानन कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला वेंगुर्ला अध्यक्ष ऋतुजा शेटकर, पोलिस श्री. सराफदार, मुख्याध्यापक संजय परब, शिक्षक खरवडे आदी उपस्थित होते.
वाहतूक पोलिस मनोज परूळेकर तसेच दामिनी पथकाच्या प्रमुख दिपिका मठकर यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक, पोक्सो, सायबर गुन्हेगारीबाबत माहिती दिली. मुख्याध्यापक संजय परब यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत राष्ट्रवादीचे आभार मानले. दि.८ ऑगस्ट रोजी ‘सक्षम तू‘ हा कार्यक्रम उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित केला आहे.
