*कोंकण एक्सप्रेस*
*एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून शिडवणे नं. १ शाळेचा अनोखा उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
आज, सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५ रोजी शिडवणे नं. १ शाळेने ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा स्तुत्य उपक्रम राबवून सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षिका, अंगणवाडी कर्मचारी आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
यात सर्वानी मिळून ३० पेक्षा जास्त सुंदर राख्या तयार केल्या. या राख्या फक्त धाग्यांनी आणि मण्यांनीच बनवलेल्या नव्हत्या, तर त्यात देशाच्या जवानांप्रती असलेले प्रेम आणि आदरही होता. या राख्यांसोबतच त्यांनी हिंदी भाषेत पत्रांद्वारे जवानांसाठी खास संदेश पाठवले. प्रत्येक विद्यार्थिनी आणि शिक्षिकेने स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पत्रात सैनिकांना या राख्या बांधून घेण्याची विनंती केली आहे.
या उपक्रमाला सांगुळवाडी कृषी कॉलेजच्या १० कृषी दूतांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यांनीही राख्या बनवण्यात आणि सैनिकांसाठी संदेश लिहिण्यात हातभार लावला.
या उपक्रमामुळे शाळेतील मुलांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. शिडवणे नं. १ शाळेने राबवलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.