*कोंकण एक्सप्रेस*
*”महाराजस्व अभियान” निमित्त नागरिकांना महसुल विभागाच्या योजनांची जनजागृती*
*कणकवली मंडळ अधिकारी कार्यालयात उपक्रमाचे आयोजन ; नागरिकांनी व्यक्त केले समाधान*
*कणकवली दि.४ ऑगस्ट*
महसूल दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात महसूल सप्ताह राबवण्यात येत आहे. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ऑगस्ट रोजी कणकवली येथील कणकवली मंडळ कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व अभियान” राबविण्यात आले. यावेळी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना मंडळ अधिकारी श्रीमती. एम.एस.नारकर यांनी दिली. यावेळी विविध प्रश्नांसंदर्भात महसुल विभागाच्यावतीने सुसंवाद साधण्यात आला.
याप्रसंगी ग्राम महसूल अधिकारी भगवान मानवर, ग्राम महसूल अधिकारी नयन चौगुले, तन्मय चिकणे,अमित स्वामी, अर्जुन घुणावात व महसूल सेवक व सर्व गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
यानिमित्ताने ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांकडून सातबारा उतारे, फेरफार, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र वाटप, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या दाखल्यांचे वाटप, अॅग्री स्टॅक ओळखपत्र तयार करणे तसेच विविध महसूल योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.यावेळी कणकवली मंडळ अंतर्गत कणकवली, कलमठ, वरवडे, पिसेकामते, हुंबरणे, हरकूळ बु., आशिये, नागवे,तरंदळे या गावातील नागरिक अभियानात सहभागी झाले होते. शासनाच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व अभियान” या उपक्रमांतर्गत नागरिकांना सातबारांचे वाटप करताना मंडळ अधिकारी श्रीमती एम.एन.नारकर सोबत ग्राम महसूल अधिकारी भगवान मानवर, ग्राम महसूल अधिकारी नयन चौगुले, तन्मय चिकणे,अमित स्वामी, अर्जुन घुणावात आदी.