*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोटोग्राफर्ससाठी सिनेमॅटिक वर्कशॉपचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशन, सोनी इंडिया आणि सन आर्ट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर्ससाठी नीलम्स कंट्री साईड, जाणवली येथे एक दिवसीय सिनेमॅटिक वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपला जिल्ह्याभरातून ८० हून अधिक फोटोग्राफर्सनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या वर्कशॉपमध्ये सोनी इंडिया कंपनीच्या आधुनिक कॅमेरे आणि लेन्सचे तांत्रिक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. व्हिडिओग्राफीसोबतच सोशल मीडियावर रील कशी तयार करावी आणि तिचा प्रभावी वापर कसा करावा, यावरही सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेचा समारोप सायंकाळी ५ वाजता झाला.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम भविष्यातही आयोजित करून जिल्ह्यातील फोटोग्राफर्सना अद्ययावत ठेवण्याचा संघटनेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.