*कोंकण एक्सप्रेस*
*दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम*
*शिरगांव : संतोष साळसकर*
दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील शेठ म.ग. हायस्कूल आणि अ.कृ. केळकर हायस्कूल, वाडा येथे ‘इतिहासाची साधने’ या विषयावर व्याख्यान आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली.
या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश्वर राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. राणे यांनी विद्यार्थ्यांना धोप, तलवार, वक्रधोप, कट्यार, वाघ नखे, दुदांडी, शिवराई, होन यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे आणि नाणी प्रत्यक्ष दाखवून त्याविषयी सखोल माहिती दिली. महाराजांच्या आरमाराविषयीची माहिती, दुर्गांचे महत्त्व, गडसंवर्धनाची आजची गरज यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, अकबराने काढलेले टोकन, मोडी लिपीतील पत्रांचे नमुने, वीरगळ आणि शिलालेख याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व ऐतिहासिक वस्तू हाताळून त्यांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, इतिहासाला जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे मालवण तालुकाध्यक्ष प्रसाद पेंडूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करण्याच्या आणि गड-किल्ले संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.