*कोंकण एक्सप्रेस*
*’सत्यापन ऍप’ मधून हयात प्रमाणपत्र प्रमाणित करण्याचे आवाहन*
*मालवण : प्रतिनिधी*
निवृत्ती वेतन योजनेतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र प्रमाणित करण्याबाबत सत्यापन ऍप ही नवीन सुविधा विकसित करण्यात आली असून सदर योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी मोबाईलवरून स्वतः किंवा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा सेतू सुविधा केंद्र किवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र किंवा पोलीस पाटील किंवा आशा वर्कस किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत आधार प्रमाणीकरणाचा वापर करून हयात दाखले प्रमाणित करून घ्यावेत, असे आवाहन मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत सामाजिक विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योज़नेंतर्गत समाजातील उपेक्षित निराधार व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. परंतु केंद्र शासन पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतर्गत लाभघेत असलेल्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र प्रमाणित करण्याबाबत ‘सत्यापन अॅप’ ही नवीन सुविधा विकसित करण्यात आले आहे. प्रमाणित केलेले हयात दाखले सदर पोर्टलवर थेट लिंक होणार आहेत.