युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे काम करणाऱ्या दत्ता सामंत यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा

युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे काम करणाऱ्या दत्ता सामंत यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा

*कोंकण एक्सप्रेस*

*युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे काम करणाऱ्या दत्ता सामंत यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा*

*भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठविले निवेदन*

*मालवण ः  प्रतिनिधी*

भाजप – शिवसेना महायुतीचा धर्म शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत हे पाळताना दिसत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विविध प्रलोभने देत, गैरसमज,धमकी पसरवत आपल्या पक्षात घेण्याचे युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे कृत्य ते वारंवार करत आहेत. दत्ता सामंत करत असलेले काम क्लेशदायक, स्वतःची मनमानी चालवणारे व युतीधर्माची नीतिमत्ता न जुमानणारे आहे. एकसंघ असणारी आपली पक्षभावना अर्थातच महायुतीचा धर्म कलुषित होऊ नये यासाठी या गंभीर बाबीची कडक दखल घेऊन योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रलोभने दाखवून त्यांचा शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा आरोप भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर याबाबत त्यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे आपलीच मनमानी चालवताना दिसत आहेत. त्यांच्या या मनमानीचा फटका केवळ आपल्या आजवरच्या अजोड अशा युतीधर्मालाच बसतो आहे असे नव्हे, तर शिवसेना संघटनेच्या जिल्ह्यातील वाटचालीलाही बसतो आहे. आपण आपल्या पद्धतीने याची खात्री करून घेऊ शकता. आपल्या नेतृत्वावर, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून शिवसेनेत आलेले जुने शिवसैनिक आज दत्ता सामंत यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहेत. आपले हक्काचे कार्यकर्ते बाजूला ठेऊन खासदार नारायण राणे यांच्या सोबत आलेल्या कार्यकत्यांना आपल्या संघटनेत घेण्याचे, आपले रिकामी प्रगती पुस्तक भरण्याचे प्रयत्न चालू आहेत. सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुती म्हणून आपल्या एकत्रित प्रयत्नातून निवडून आलेले आमदार निलेश राणे तसेच आमदार दीपक केसरकर यांचे महायुती म्हणून आजही भाजपाशी संबंध अत्यंत सामंजस्याचे, योग्य समन्वयाचे आणि युती धर्माचा आदर करणारे आहेत. मात्र आपले जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे जाणीवपूर्वक युतीधर्म बिघडवण्याची कोणाची तरी सुपारी येऊन काम करत आहेत की काय असा संशय येण्याजोग्या मनमानीने त्यांचा एकूण कारभार चाललेला आहे. उबाठा व अन्य विरोधी पक्षाचे पदाधिकारी यांना बाजूला ठेवत भाजपा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश पक्षात जाणीवपूर्वक घेतला जात आहे, असे बाबा मोंडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

शिवसेना पक्षातील मूळ शिवसैनिकांना डावलून आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची भरती ज्याची विधानसभेत बूथ मायनस होते त्यांना पदे देत संघटनेवर वरचष्मा राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ दत्ता सामंत यांच्या अशा चुकीच्या पद्धतीमुळे आज आपली शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षात संघटनात्मक अस्वस्थता आहे हे आपण योग्य पद्धतीने आढावा घेतल्यास आपल्या निदर्शनास येईल, असेही बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.

विकासाचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन एकत्रितपणे तसेच सक्षमपणे आपली वाटचाल चालू असताना त्यात मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो आपण खपवून घेऊ नये. आज महायुतीच्या वाटचालीसाठी अत्यंत पोषक वातावरण सर्वत्र आहे. यात प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देत सक्षम बनवावे हीच आमची भूमिका होती आणि राहील. मात्र महायुतीच्या धर्माचा आदर करून युतीत बेबनाव होईल अशा पद्धतीने आपले जिल्हाप्रमुख दत्ता सामंत करत असलेले काम क्लेशदायक, स्वतःची मनमानी चालवणारे व युतीधर्माची नीतिमत्ता न जुमानणारे आहे. अशा परिस्थितीत अत्यंत नाईलाजाने ही व्यथा अखेर आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत कारण आपले सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत हे आता कोणाचेही ऐकण्याच्या भूमिकेत नाहीत. त्यामुळे एकसंघ असणारी आपली पक्षभावना अर्थातच महायुतीचा धर्म कलुषित होऊ नये यासाठी आता आपणच दखल घ्यावी, असेही मोंडकर यांनी ना. शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!