*कोंकण एक्सप्रेस*
*आचरा पिरावाडी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला*
*मालवण ः प्रतिनिधी*
कालपासून बेपत्ता असलेल्या आचरा पिरावाडी येथील भालचंद्र मेघश्याम कुबल (वय ४२) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या राहत्या घराच्या बाजूच्या विहिरीत सापडून आला. याबाबत आचरा पोलीस स्थानकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आचरा पिरावाडी येथील भालचंद्र मेघश्याम कुबल हे काल रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ घराशेजारील विहिरीकडे गेला असता त्यांना विहिरीतील पाण्यात भालचंद्र यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत माहिती मिळताच आचरा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम पडवळ, पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबूलकर, पोलीस हवालदार दिगंबर घाडीगावकर तसेच पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, पोलीस पाटील श्री. धुरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. मृतदेह विहीरीबाहेर काढून तो मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आणून शवविच्छेदन केल्यावर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत आचरा पोलीस ठाण्यात भालचंद्र कुबल यांचा पाण्यात बुडून आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास आचरा पोलीस करत आहेत.
भालचंद्र कुबल हे मच्छिमार होते. ते घटस्फोटीत होते. त्यांच्या पश्चात वडील, दोन मुली, दोन भाऊ, एक बहिण, भावोजी, वहिनी, काका, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे.