*कोंकण एक्सप्रेस*
*एनसीसी प्रशिक्षक लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांचा कुडाळ रोटरी क्लबतर्फे सन्मान*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांनी प्रशिक्षक म्हणून अथक परिश्रम घेत अनेक यशस्वी व उल्लेखनीय कामगिरी करणारे एनसीसी विद्यार्थी घडवल्याबद्दल कुडाळ येथे रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने कुडाळचे तहसीलदार श्री. विरसिंग वसावे यांच्या हस्ते प्रा. खोत यांचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि संरक्षण क्षेत्रात स. का. पाटील महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) विद्यार्थ्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल केले असून NCC प्रशिक्षक लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत तसेच भारतीय सैन्यात मिळवलेले यश हे अभिमानास्पद असे आहे. प्रा. खोत यांच्या या लक्षवेधी कामगिरीची व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची रोटरी क्लब ऑफ कुडाळने दखल घेतली. कुडाळ येथे आयोजित सत्कार समारंभात लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांना कुडाळचे तहसीलदार श्री. विरसिंग वसावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रा. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या पालकांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
स. का. पाटील महाविद्यालय, मालवणचे NCC विभाग हे केवळ सैन्य प्रशिक्षणाचे केंद्र न राहता, विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्वगुण, देशप्रेम आणि राष्ट्रसेवेची भावना रुजवणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. त्यांच्या या कार्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे आणि भविष्यातही हे विद्यार्थी जिल्ह्याचे नाव असेच रोशन करत राहतील अशी आशा आहे, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.