*कोंकण एक्सप्रेस*
*महायुती सरकारमधील सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार मात्र उपाशी*
*ठेकेदारांच्या थकीत बिलांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकारचा केला निषेध*
*कणकवली सा. बां. उपअभियंता कार्यालयाकडे केले निषेध आंदोलन*
*आत्महत्या केलेल्या हर्षल पाटील याला वाहिली श्रद्धांजली*
जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे पैसे सरकारकडून न मिळाल्याने सांगली येथील तरुण ठेकेदार हर्षल पाटील याने आत्महत्या केली तशी वेळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांवर येऊ नये. आणि भाजप महायुती सरकारने ठेकेदारांचे थकीत ठेवलेले पैसे तात्काळ द्यावेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी तुपाशी ठेकेदार उपाशी, हर्षल पाटील याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या भाजप महायुती सरकारचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच उपअभियंता कार्यालयाच्या गेटवर हर्षल पाटील याला श्रद्धांजली अर्पण करणारा बॅनर लावून २ मिनिट स्तब्ध उभे राहत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, महायुती सरकारने लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते मिळविण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करून वेगवेगळी कामे महाराष्ट्रात सुरु केली. मात्र त्या कामांसाठी सरकारने पैशांची तरतूद केली नाही.राज्यात ठेकेदारांच्या बिलाचे ८० हजार कोटी रु थकीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ठेकेदारांचे शेकडो कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतील १७३ ठेकेदारांची २४.६३ कोटी रुपयांची थकबाकी शासनाकडे आहे. तसेच कणकवली सा. बा. विभागात १२० कोटी रु. आणि सावंतवाडी सा. बा. विभागात १०० कोटी रु. प्रलंबित आहेत. आमदार फंड, जिल्हा नियोजन निधी, ग्रामपंचायतींचा निधी थकीत आहे. प्रलंबित असलेल्या बिलांबाबत निधीची तरतूदही अधिवेशनात करण्यात आली नाही. याउलट हायब्रीड अँन्यूईटीची १०० कोटींची कामे आहेत त्यासाठी मात्र सरकारने ठेकेदारांना आगाऊ पैसे दिलेत.आणि त्यातून सत्ताधाऱ्यांनी कमिशन घेतले आहे. मात्र छोट्या ठेकेदारांची बिले प्रलंबित ठेवली आहेत. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. एखाद्याच्या मृत्यूने तरी सरकारला जाग येईल का? असा सवाल वैभव नाईक यांनी यावेळी उपस्थित केला.
कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशनची कोट्यवधी रुपयांची कामे सुरु आहेत.परंतु केलेल्या कामांचे पैसे ठेकेदारांना मिळत नाहीत. तीच परिस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी निवृत्ती पूर्वी कोट्यवधी रुपयांच्या कामाचे जॉब काढले मात्र त्या कामांना पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाहीत.त्यामुळे ठेकेदार कर्जाच्या खाईत गेले आहेत. सिंधुदुर्गात हर्षल पाटील सारखी घटना घडू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांचे पैसे मिळवून द्यावेत असे आवाहन सतीश सावंत यांनी केले त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांची बिले थकलेल्या ठेकेदारांचे समुपदेशन तत्कालीन कार्यकारी अभियंता सर्वगोड यांना करायला सांगा असा टोला देखील यावेळी सतीश सावंत यांनी लगावला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,तालुका संघटक राजू राठोड, राजू शेट्ये, राजू राणे, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तेजस राणे,माधवी दळवी,रुपेश आमडोस्कर,जयेश धुमाळे,विलास गुडेकर, धीरज मेस्त्री , ललित घाडीगावकर, गुरुनाथ पेडणेकर, आबू मेस्त्री,प्रवीण तांबे,तात्या निकम,शिरीष घाडीगावकर, लक्ष्मण हन्नीकोड, उद्धव पारकर,पंडित तांबे आदी शिवसैनिक उपस्थित होते.