*कोंकण एक्सप्रेस*
*लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्याला अटक*
*मालवण ः प्रतिनिधी*
जमिनीच्या कागदपत्रावर वारस तपास करून नोंद घालण्यासाठी ४ हजार रुपयांची रक्कम स्विकारणाऱ्या मसुरे येथील तलाठी निलेश किसन दुधाळ (वय २६) याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने रंगेहाथ पकडल्यावर त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. त्याला आज ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबतची तक्रार मसूर डांगमोडे येथील एका युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. मसुरे डांगमोडे गावातील दोन ग्रामस्थ हे जमिनीचे वारस तपास करण्यासाठी मसुरे तलाठी कार्यालय येथे दोन महिन्यापूर्वी गेले होते. परंतु त्या ठिकाणी तलाठी उपलब्ध न झाल्याने व त्यांना तातडीने मुंबईला जायचे असल्याने त्यांनी याबाबतची कागदपत्रे गावच्या एका इसमाकडे सुपूर्द करत ती तलाठ्यांना देण्यास सांगितले होते. त्यानुसार संबंधित व्यक्तीने त्या ग्रामस्थांचे दोन्ही अर्ज तलाठी कार्यालयात जमा केले. हे दोन्ही अर्ज प्रलंबित होते. याबाबत संबंधितानी तलाठ्याची भेट घेतली असता त्याने प्रत्येक वारस तपासासाठी २ हजार रुपये प्रमाणे दोन वारस तपासासाठी ४ हजार रुपये रुपये द्यावे लागतील असे कळविले. मात्र त्यांना तलाठी यांना पैसे देण्यात स्वारस्य नसल्याने त्यांनी १६ जुलै रोजी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस उपअधीक्षक विजय शिवराम पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून तलाठी निलेश किसन दुधाळ याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. निलेश दुधाळे याला ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला आज जिल्हा न्यायलयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस उपअधीक्षक विजय शिवराम पांचाळ हे करत आहेत.