*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रम*
*कनेडी ः प्रतिनिधी*
आनंददायी शनिवार हा महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेला एक अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शाळेत अधिक आनंदी आणि उत्साही वातावरण मिळावे हा आहे. यासाठी प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्ग ऐवजी विद्यार्थ्यांसाठी विविध ॲक्टिव्हिटीज, खेळ, कला आणि क्रीडा तसेच आरोग्य आणि सामाजिक विषयांवर आधारित कार्यक्रम घेतले जातात.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. कराटे ही एक मार्शल आर्ट आहे, जी जपान मधील ओकिनावा या बेटावर विकसित झाली. यात हल्ला आणि बचावासाठी हात आणि पाय यांचा वापर केला जातो. कराटे मध्ये शारीरिक ताकद चपळाई आणि मानसिक एकाग्रता तसेच स्व संरक्षणाचे धडे दिले जातात, या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. तसेच प्रशालेतील उपक्रमशील कला शिक्षक श्री. समीर गुरव सर यांनी विद्यार्थ्यांना मातीकाम कला शिकवली. यात विद्यार्थ्यांनी गणपती, महादेवाची पिंड, नागोबा विविध प्रकारची फळे, फुले यांच्या प्रतिकृती बनवत आनंददायी शनिवार साजरा केला.
सदर उपक्रमासाठी प्रशालेतील पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, कराटे प्रशिक्षक श्री. साई दळवी, कला शिक्षक श्री. समीर गुरव यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच मंदार मिस्त्री सर, जाधव मॅडम व इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.