*कोंकण एक्सप्रेस*
*कांदळवन तोडून जाळल्या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल*
*मोर्वे येथील घटना, प्रांताधिकारी यांच्या तक्रारी वरून कारवाई*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
देवगड तालुक्यातील मोर्वे येथील गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या खाडीनजीक कांदळवनांची तोड करून ती जाळण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 एप्रिल 2025 ते 19 जून 2025 या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्वे येथील गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या खाडीनजीकच्या कांदळवनातील पांढरी चिपी, कांदळ, तिवर, पुरवा, हुरा अशी झाडे अज्ञाताने तोडून ती जाळली आहेत. याबाबत उपविभागीय कार्यकारी अधिकारी तथा तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समिती- देवगडचे अध्यक्ष जगदीश नारायण कातकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.