*कोंकण एक्स्प्रेस*
*वारेरी खून प्रकरणातील आरोपीला २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी*
*देवगड : प्रशांत वाडेकर*
देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीक असलेल्या चिरेखाणीवर आपल्या चुलत भावाचा खून करणारा परप्रांतीय कामगार रितीक दिनेश यादव (२०, मूळ रा. मध्यप्रदेश) या संशयिताला देवगड पोलिसांनी अटक करून गुरुवारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने संशयिताला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे. या चिरेखाणीवर संशयित रितीक यादव व त्याचा चुलत भाऊ कृष्णकुमार जुगराज यादव (२०, मूळ रा. मध्यप -देश) हे कामाला होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्यात सिगारेट पेटविण्याच्या लायटरवरून वाद झाला. या वादाचा राग मनात ठेवून संशयित रितीक यादव याने चिरेखाणीवरील ट्रकमधील व्हील पान्याने कृष्णकुमार याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात कृष्णकुमार याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. देवगड पोलिसांनी संशयित रितीक यादव याला तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची फिर्याद चिरेखाणीचे मुकादम विजय शेंडगे यांनी देवगड पोलिसात दिली होती. गुरुवारी संशयित रितीक यादव याला देवगड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.