*कोकण Express*
*आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश, केंद्राकडून तळेरे – गगनबावडा महामार्गाला 167 कोटी मंजूर*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या तळेरे – गगनबावडा या महामार्गाला केंद्राकडून तब्बल 167 कोटी चा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील या प्रमुख राष्ट्रीय महामार्गाला इतका भरघोस निधी मिळाला आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग निर्धोक होणार असल्याने मतदारसंघातील नागरिक, पर्यटक व प्रवाशांत समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे आभार मानले जात आहेत.
वैभववाडी शहरातून हा महामार्ग जातो. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी नापणे धबधबा, निसर्गाची अद्भूत शक्ती असलेला नाधवडे उमाळा ही स्थळे याच महामार्गानजीक आहेत. रस्ता नुतनीकरणामुळे या मार्गावरुन पर्यटकांची व प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर तळेरे – गगनबावडा या महामार्गात करूळ घाट येतो. पर्यटकांना अधिक आकर्षित करणारा व पर्यटकांवर मोहिनी घालणारा घाट अशी करुळ घाटाची ओळख आहे. नैसर्गिक आपत्ती या घाटाची सातत्याने पडझड झाली आहे. आमदार नितेश राणे यांच्याकडून दरवर्षी या घाट मार्गाची पाहणी केली जाते. हा मार्ग निर्धोक व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. या रहदारीच्या मार्गाला निधी मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार नितेश राणे यांनी लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच इतके मोठे यश लाभले आहे.