*कोंकण एक्सप्रेस*
*दहावीतील संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण येथील नगर वाचन मंदिर आणि डॉ. नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्यावतीने मालवण शहरातील काही प्रमुख प्रशालांमधील सन २०२५ यावर्षी इ. १० वी मध्ये मराठी आणि निम मराठी माध्यमातून संपूर्ण तसेच संयुक्त संस्कृत विषय घेऊन अव्वल आलेल्या ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती व शिष्यवृत्ती सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
नगर वाचन मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कुशे, प्रमुख अतिथी डॉ. सुभाष दिघे त्याचबरोबर उपस्थित पालक व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. सुभाष दिघे म्हणाले, संस्कृत भाषेचा प्रचार आपण सर्वांनी करायचा आहे. संस्कृतचे ज्ञान केवळ १० वी पुरते मर्यादित न ठेवता जेवढे ज्ञान संस्कृत भाषेत मिळेल तेवढे ज्ञान आत्मसात करावे, असेही ते म्हणाले. प्रकाश कुशे यांनी यावेळी डॉ. विजय नारिंग्रेकर यांनी हा उपक्रम ग्रंथालयाच्या माध्यमातून सुरू केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी विद्याथिनींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आर्या अजित राणे, श्रेयस चंद्रशेखर बर्वे, निशांत शरद धुरी या अ.शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या मुलामुलींना प्रत्येकी रु. १०,०००/- व जिज्ञासा शिवराम सावंत, संकेत सखाराम तोतरे यांना प्रत्येकी रु. २,०००/- तर कु. आर्यन आनंद गोलतकर व जान्हवी प्रमोद चव्हाण या भंडारी हायस्कूलच्या मुलामुलींना प्रत्येकी रु. ३,०००/- एवढी शिष्यवृत्ती व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी शिक्षिका सौ. स्नेहा बर्वे यांनी विचार मांडत संस्थेच्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. पालकांमधून अजित राणे व विद्यार्थ्यांमधून आर्यन गोलतकर यांनी मनोगते व्यक्त कैली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रेया चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी मेहनत घेतली.