*कोंकण एक्सप्रेस*
*विकास सावंत यांच्या निधनाने ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत*
*दुःखद प्रसंगी मी त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार करू शकत नाही : आ. दिपक केसरकर…*
*वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द…*
*शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी प्रयत्न…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकास सावंत यांच्या निधनाने ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत झाल्याची भावना माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
शिखर बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी फार मोठे कार्य केले होते. कै. भाईसाहेबांचा शिक्षणाचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला, आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. अशा भावना श्री. केसरकर यानी व्यक्त केल्या,
सावंतवाडी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आज केसरकर यांनी सावंत कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या निकटच्या व कौटुंबिक संबंधांना उजाळा दिला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर निश्चितच भरपूर प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या सदिच्छा नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. म्हणूनच तब्बल चार वेळा त्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिले. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार करू शकत नाही असे स्पष्ट करीत वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे आमदार केसरकर यांनी जाहीर केले. पुढील काळात गावागावात जाऊन जनतेसाठी वेळ देणार असल्याचे आणि सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांमध्ये एका शासकीय कार्यालयात बसून जनतेची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माझे पुढील सर्व जीवन हे जनतेसाठी समर्पित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाबाबत कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत. तेथील शेतकऱ्यांना जमिनीचे भाव वाढवून हवे आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या भागात शेतकयांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. तो भाग वगळून आता नव्या जागेतून हा महामार्ग नेण्यासाठी प्रयन सुरु आहेत, हा महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा आणि मुंबई-गोवा महामार्गालाही जोडण्यात यावा, यासाठी प्रयत्नशील असून त्या दृष्टीने नवीन सर्वे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न होता. समृद्धीचा हा शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी प्रयन करु असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.