*कोंकण एक्सप्रेस*
*मुलांनी आपल्यातील कला कौशल्ये विकसित करून प्रगती साधावी – भूषण मेतर*
*भंडारी हायस्कुलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा*
*मालवण ः प्रतिनिधी*
मुलांनी अभ्यासाबरोबरच आपल्यातील गुण, विशेष कौशल्य व कला ओळखून ते जोपसावेत. मुलांनी आपल्यातील कला कौशल्ये केवळ छंद म्हणून न जोपसता ती विकसित करून त्याला व्यावसायिक रुप देऊन स्वतःची प्रगती साधावी, असे प्रतिपादन मालवण मधील पत्रकार व करवंटी कलाकार भूषण मेतर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा झाला. यानिमित्त प्रशालेतील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (MSAT) विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी, पत्रकार व करवंटी कलाकार भूषण मेतर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन भूषण मेतर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक हणमंत तिवले, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (MSAT) विषयाचे ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक केशव भोगले, अभियांत्रिकी विभागाचे जगन्नाथ आंगणे, शेती पशु पालन विभागाच्या सौ. नेहा गवंडे , गृह आरोग्य विभागाच्या सौ. दर्शना मयेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक केशव भोगले यांनी करत युवा कौशल्य दिनाचे महत्त्व समजावून दिले. सौ. दर्शना मयेकर यांनी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी भूषण मेतर यांचा प्रशालेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन मुख्याध्यापक श्री. तिवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वामन खोत यांनी मुलांमधील कला कौशल्यांना शालेय जीवनातच चालना दिली पाहिजे, तरच ती भविष्यात वृद्धिंगत होतील, याच दृष्टीने भंडारी हायस्कुलमध्ये कला कौशल्यावर आधारित कोर्सचे शिक्षण देण्यात येत असून मुलांनी ते शिकून स्वतःचा फायदा करून घ्यावा तसेच भविष्यात उद्योजक, व्यावसायिक बनावे, असे सांगितले.
यावेळी भूषण मेतर यांनी करवंटी सारख्या टाकाऊ वस्तूपासून बनविता येणाऱ्या विविध वापरायोग्य व शोभेच्या इकोफ्रेंडली वस्तू याविषयी माहिती देतानाच या वस्तुंना असलेली मागणी, त्यातील व्यावसायिक संधी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच करवंटी वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी मुलांना दाखवले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन जगन्नाथ आंगणे यांनी केले. आभार विद्यार्थी ध्रुव गोलतकर याने मानले.