*कोकण Express*
*मुख्या. राजेंद्र नारकर यांचे कार्य नेहमी स्मरणात राहिल!*
*कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांचे गौरवोद्गार; सेवानिवृत्त प्राचार्य आर. व्ही. नारकर यांचा कासार्डे विद्यालयातर्फे सत्कार*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र नारकर उर्फ आर. व्ही. नारकर यांचा कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कूल कमिटी चेअरमन मधुकर खाड्ये व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र नारकर आपल्या नियत वयोमानानुसार ३१ मार्च २०२१ रोजी अखंड ३५ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने मुख्याध्यापक आर. व्ही. नारकर यांचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सिनिअर काॅलेज विभाग, शिक्षक भारती सिंधुदुर्ग परिवाराच्या वतीनेही प्राचार्य नारकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन मधुकर खाडये यांनी करताना सत्कारमूर्ती प्राचार्य राजेंद्र नारकर यांच्या प्रदीर्घ व यशस्वी वाटचालीचा आढावा घेत अनेक आठवणींना उजाळा देऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक राजेंद्र नारकर यांनी शाळेसाठी प्रामाणिकपणे केलेले कार्य नेहमी स्मरणात राहील असे सांगत त्यांच्या विशेष कार्याचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी विशेष कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळा व विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून मी कार्यरत राहिलो. काम करीत असताना संस्था पदाधिकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिळालेल्या उत्तम सहकार्यामुळे कासार्डे विद्यालयाचा यशाचा आलेख उंचावता आला असे मत सत्काराला उत्तर देताना राजेंद्र नारकर यांनी व्यक्त करीत कोणतेही काम झोकून देऊन केले की, मानसिक समाधान मिळते असे सांगून शाळेसाठी प्रामाणिकपणे विविध उपक्रम राबवत राहण्याचेही त्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याप्रसंगी आवाहन केले.
यावेळी शिक्षकांमधून एन. सी. कुचेकर, बी. बी. बिसुरे, एस्. व्ही. राणे, ए. पी. घुले, प्रा. रामचंद्र राऊळ, आर. आर. सरवणकर, आर.ए. कासार्डेकर, दत्तात्रय मारकड, सुनिता कांबळे, प्रा. अनिल जमदाडे, सोनाली पेडणेकर, प्रा. दिवाकर पवार, प्रा. विनायक पाताडे, प्रियांका सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य राजेंद्र नारकर यांच्या उत्कृष्ट पैलूंचे विशेष कौतुक करीत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष परशुराम माईणकर यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेंद्र नारकर हे सर्वगुणसंपन्न व्यक्ती असून त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी केलेले काम इतरांनाही प्रेरणा देत राहील असे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कुचेकर यांनी केले तर भाग्यश्री बिसुरे यांनी मानलेल्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसभर माजी विद्यार्थी तसेच मान्यवरांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने प्राचार्य राजेंद्र नारकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली होती.