*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाकडून देवगड महाविद्यालयात सुरक्षा प्रशिक्षण*
*देवगड: प्रशांत वाडेकर*
श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड येथील एन.सी.सी. युनिटने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एन.डी.आर.एफ.) मार्फत (एन.डी.आर.एफ.) सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. सद्यस्थितीमध्ये वाढत असलेल्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती आणि सदर आपदेचा यशस्वीपणे मुकाबला करणेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृतीची असलेली आवश्यकता तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ अन्वये प्रशिक्षण व क्षमतावर्धन करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भूकंप, भूस्खलन, पूर परिस्थिती, अग्निशमन, प्राथमिक चिकित्सा इ. मधील प्रात्यक्षिके दाखवत रंजकपणे एन.डी.आर.एफ च्या १८ जवानांनी टीम कमांडर इन्स्पेक्टर आर. जे. यादव यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या प्रशिक्षणाचा १०६ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, सिंधुदुर्ग यांच्यावतीने निवासी नायब तहसीलदार श्री. व्हि. व्हि. शेठ, श्री. प्रदीप कदम आणि श्री. गणेश कुबल हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. व्ही.बी. कुनुरे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या श्रीम. सामंत यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत महाविद्यालयाच्या एन. सी. सी. ऑफिसर लेफ्ट. सुनेत्रा ढेरे यांनी केले होते. प्राध्यापिका शामली तारी व प्रीती सारंग, यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.