*कोकण Express*
*कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर जास्त भर द्यावा*
*कणकवली प.स.सभापती मनोज रावराणे*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता आरटीपीसीआर टेक्टपेक्षा लसीकरणावर जास्त भर द्यावा. सर्वांनी स्वतःबरोबरच कुटुंब आणि समाजाची काळजी घेऊन सामाजिक बांधिलकी पाळावी, असे आवाहन कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील नियोजन बैठकीमध्ये केले. फोंडाघाट बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसाठी बुधवार आणि गुरुवार दिवशी लसीकरण प्राधान्याने करण्याचे निर्देश सभापती रावराणे यांनी आरोग्य विभागाला दिले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन जंगम, विस्तार अधिकारी धनवे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, प्रसाद मांजरेकर आणि बाजारपेठेतील व्यापारी उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांनी व्यापाऱ्यांना १५एप्रिल पर्यंत आरटीपीसी टेस्ट करून त्याचा दाखला दुकानात उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही टेस्ट व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कमी पडणारी आहे. त्याऐवजी करोना लसीकरण सर्वसमावेशक केल्यास सर्व व्यापारी, दुकानात काम करणारे कोरोना मुक्त होतील व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगी ठरेल असे स्पष्ट मत व्यापार्यांनी मांडले.शिवाय लसीकरण केलेल्यांनी आरटीपीसी टेस्ट करावी याबाबतही निःसंदिग्धता आहे. व्यापारी व दुकानात काम करणारे बहुतांश व्यक्ती ४५ वर्षाखालील असल्याने सरसकट ४० वर्षाखालील सर्वांचेच लसीकरण करावे व त्यासाठीच्या रजिस्ट्रेशन करिता नियमावली शिथिल करावी ,अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली. याबाबत जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीतही चर्चा केली जाणार असल्याचे समजते.
१ एप्रिलपासून सर्व दिवस लसीकरण केले जाणार असल्याची घोषणा सरकार तर्फे केली गेली आहे. त्याप्रमाणे फोंडाघाट पंचक्रोशीतील लाभार्थ्यांचा प्रतिसाद पाहून लस उपलब्ध केली जाणार आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जंगम यांनी सांगितले. त्यामुळे फोंडाघाट पंचक्रोशीतील आरोग्य सेवक- सेविका यांच्या नोंदणी नुसार ४५ वर्षावरील सर्वांनी कोरोना लस घ्यावी आणि फोंडाघाट विभागाचे १००% लसीकरण पूर्ण करावे. तसेच आरटीपीसी टेस्ट युनिट सुद्धा कार्यान्वित करण्यात आल्याचे तालुका अधिकारी डॉक्टर पोळ यांनी सांगितले. यावेळी राजन चिके ,बबन पवार, हर्षल तेंडुलकर, संदीप पारकर, गुणेश कोरगांवकर, रमेश भोगटे,कुमार नाडकर्णी, आदी व्यापारी उपस्थित होते.