राजकोट किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात सत्ताधारी व अधिकाऱ्यांकडून पुन्हा भ्रष्टाचार!

राजकोट किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात सत्ताधारी व अधिकाऱ्यांकडून पुन्हा भ्रष्टाचार!

*कोंकण एक्सप्रेस*

*राजकोट किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात सत्ताधारी व अधिकाऱ्यांकडून पुन्हा भ्रष्टाचार!*

*मालवण शहरात प्रति गुंठा ३० लाख रु. प्रमाणे ९८ गुंठे खाजगी जमीन खरेदीसाठी ३० कोटींचा शासनाकडे प्रस्ताव*

*माजी आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक आरोप*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने १०० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. त्यासाठी २ एकर १८ गुंठे जमीन संपादित करण्यात येणार असून या जमिनीवर मालवण नगरपरिषदेचे आरक्षण आहे. सीआरझेड मध्ये ही जमीन येत आहे. या जमिनीच्या भूसंपादनासाठी भाजप आणि शिंदे गटाचे सत्ताधारी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी संगनमताने २९ कोटी ६१ लाख ४२ हजार रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे. त्यानुसार एका गुंठयाला सरासरी ३० लाख २१ हजार ८५७ रुपये किंमत देऊन मालवण शहरातील ही जमीन संपादित केली जाणार आहे. शासकीय मूल्य दराच्या पाचपट मोबदल्यात हि जमीन खाजगी वाटाघाटी द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरित केली जाणार आहे. खाजगी वाटाघाटीमुळे शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाणार आहे असा खळबळजनक आरोप कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

एका गुंठ्याला सुमारे ३० लाख २१ हजार रुपये दिली जाणारी रक्कम खरोखरच संबंधित जमीन मालकांना मिळणार आहे का? की सत्ताधारी नेते आणि अधिकारी यांच्यामध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत? त्याचबरोबर मालवण शहरातील इतर आरक्षित जमिनींना देखील हाच दर महायुती सरकार देणार का? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

वैभव नाईक पुढे म्हणाले, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, परिसर सुशोभीकरण करणे व आता शिवसुष्टी हे जणू सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि काही अधिकारी यांना भ्रष्टाचाराचे कुरण वाटत आहे. याठिकाणच्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. सुरुवातीला २ कोटी ३६ लाख रु खर्च करून राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळला त्यामुळे पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. त्याचबरोबर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ४ कोटी ५ लाख ७३ हजार २२३ रु खर्च करण्यात आले ते देखील काम तकलादू झाल्याने सुशोभिकरणासाठी लावलेले चिरे कोसळले होते. आता ३२ कोटी रु खर्च करून कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात आला आहे.प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी सुंदर आणि दर्जेदार पुतळा उभारला आहे त्या पुतळ्याला धोका नाही. मात्र पुतळ्याच्या चबुतऱ्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने फ्लोरिंगचे जे काम केले आहे. त्याला पहिल्याच पावसात मोठे भगदाड पडले आणि आजूबाजूचा परिसर देखील खचत आहे. त्यामुळे या कामातही भ्रष्टाचार झाला आहे. भाजप महायुतीचे सत्ताधारी आणि काही अधिकारी एवढयावरच थांबले नसून शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनातही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाणार आहे. एकीकडे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा समावेश झाला आहे मात्र दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आणि काही अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात, तेथील सुशोभिकरणात आणि आता शिवसृष्टीत भ्रष्टाचार करीत आहेत असा पोलखोल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!