*कोंकण एक्सप्रेस*
*आ. दीपक केसरकरांच्या वाढदिवसाला विविध उपक्रम*
*शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांचा वाढदिवस येत्या १८ जुलै रोजी सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने १६ जुलैपासून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
श्री. परब म्हणाले, वाढदिवसानिमित्त विशेषतः १६ जुलैपासून बॅ. नाथ पै सभागृहात नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात संयुक्त दशावतार आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाचा समावेश आहे. याशिवाय, विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. यामध्ये रुग्णालयांमध्ये फळवाटप, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना खाऊवाटप, आरोस येथील दिव्यांग शाळेतील मुलांना कॅरम आणि बॅडमिंटन साहित्य वाटप, तसेच गोरगरीब लोकांना धान्यवाटप इत्यादींचा समावेश आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचा मुख्य सोहळा १८ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता गोविंद चित्रमंदिर सभागृहात पार पडेल. या सोहळ्याला कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून महायुतीचे पदाधिकारीही उपस्थित असणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नये असे आवाहन संयोजकांनी केले आहे. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, महिला आघाडी प्रमुख अॅड. नीता सावंत कविटकर, आजगांव सरपंच यशश्री सौदागर, क्लेटस फर्नांडीस, अर्चित पोकळे, सत्यवान बांदेकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.