*कोंकण एक्सप्रेस*
*काजूप्रक्रिया उद्योग : मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संकल्प प्रतिष्ठान द्वारा काजू प्रक्रिया उद्योग या विषयावर मोफत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक २० जुलै, २०२५ रोजी सकाळी ठीक १० वा. गोपूरी आश्रम, वागदे, कणकवली येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत काजू प्रक्रिया माहिती, प्रक्रिया मशीनरी माहिती, यशस्ची उद्योजकांचा अनुभव व मार्गदर्शन आणि शासकीय अनुदान रुपी सहाय्य या सर्व बाबींवर मोफत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
संकल्प प्रतिष्ठान ही संस्था गेली १४ वर्षे सातत्याने उद्योग, व्यवसाय व कृषी विषयक मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करीत असून त्यायोगे सुशिक्षित बेरोजगार, महिला व शेतकऱ्यांना उद्योगकतेकडे वळवण्यास कार्यरत आहे. अनेकांनी या प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपले उद्योग, व्यवसाय सुरु केले आहे.
काजू प्रक्रिया उद्योग हा अनेक उद्योग संधी पैकी एक उद्योगसंधी होय. याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. पण संकटातच संधी दडलेली असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरी, गृहिणी किंवा शिक्षणानंतर कामाच्या शोधात असलेला युवा वर्ग यांच्यासाठी काजू प्रक्रिया उद्योग तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषतः कोकण भागात जिथे काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, तिथे ही संधी सोन्यासारखी आहे !
*काजू प्रक्रिया म्हणजे नेमकं काय?*
काजू प्रक्रिया म्हणजे काजू बी वर विविध प्रक्रिया करून विक्रीयोग्य काजूगर उत्पादित करणे होय. यात विविध टप्पे असतात. जसे 1. काजू वाळवणे व साठवणूक, 2. बॉयलिंग (उकळणे), 3. ड्रायिंग (कोरडे करणे), 4. शेलिंग (टणक कवच फोडणे), 5. पिलिंग (सॉफ्ट स्किन काढणे), 6. ग्रेडिंग (साईज व प्रकारानुसार वर्गीकरण), 7. पॅकिंग इ.
हे सर्व टप्पे सोप्या प्रशिक्षणाने शिकता येतात. ही सर्व प्रक्रिया विविध यंत्रसामुग्रीच्या मदतीने पूर्ण करता येते.
काजूबी मोठ्या प्रमाणात बारामाही उपलब्य होत असते तसेच काजूगरांना बारामाही मागणीही असते. त्याचप्रमाणे काजूगरांपासून फ्लेवर्ड काजूगर, बर्फी, लाडू, चिक्की, मोदक असे अनेक मुल्यावर्धित व मागणी असलेले उत्पादनेही तयार करता येतात. काजू प्रक्रिया उयोगासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यास 25% ते 35% पर्यंत अनुदान शासनाकडून मिळू शकते.
महिलांसाठी आणि तरुणांसाठी ही तर सुवर्णसंधीच आहे.
काजू प्रक्रिया हा व्यवसाय घरगुती स्वरूपात पण सुरु करता येऊ शकेल त्यामुळे गृहिणींसाठी हे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तरुणांनीही सामूहिक स्वरूपात (ग्रुप फॉर्म करून) प्रक्रिया युनिट सुरू केल्यास लवकर यश मिळू शकते.
काजू प्रक्रिया हा व्यवसाय फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही रोजगार निर्माण करू शकतो. आता वेळ आहे पुढे येण्याची. हातात कौशल्य घ्या, मार्गदर्शन घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आपला प्रवास इथेच सुरू होऊ शकतो – एका छोट्या प्रशिक्षणातून, एका मोठ्या यशाकडे!
यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे संकल्प प्रतिष्ठान व्दारा आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
संकल्प प्रतिष्ठान, हाय वे व्हू रेस्टॉरंट मागे, वागदे, कणकवली
👉 संपर्क: 9307103402