*कोंकण एक्सप्रेस**
*जिल्ह्यातील साकवांची आणि रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करा*
*- खासदार नारायण राणे*
*सिंधुदुर्गनगरी दि 14 (जिमाका)*
पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची डागडूजी व दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार श्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
खासदार श्री राणे म्हणाले की, पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने लोकांना वाहन चालवताना खूप त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत त्यामुळे जिल्ह्यतील सर्व रस्त्यांची तात्काळ दुरुस्तीची गरज आहे. दुरूस्तीचे काम मानकानुसार (नॉर्म्स) होईल याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील अनेक साकव देखील नादुरूस्त झालेली आहेत. ही साकवे देखील प्राधान्याने दुरूस्ती करावीत जेणेकरुन नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. साकवांबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत असे काम करा. नवीन साकव बांधत असताना त्याची गुणवत्ता तपासून ते उत्कृष्ट असतील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देखील श्री राणे यांनी प्रशासनाला दिले.