*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यार्थ्यांनी नोक-यांच्या मागे न लागता उद्योजक बनावे: डॉ. बाळकृष्ण गावडे*
*आशिये ग्रामपंचायतच्या वतीने दहावी , बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देशात मोदी सरकार येण्यापूर्वी कुठलीही वस्तु घेतली तर मेड इन जपान , मेड इन चायना , मेड इन युएसए यासह अन्य देशांच्या वस्तु आपल्या घरात येत होत्या. परंतु आपण स्वयंपूर्ण बनलं पाहिजे, आणि हे आपण तयार केलं पाहिजे , यासाठी मेक इन इंडिया हा उपक्रम 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात सुरु झाला. आता हळूहळू मेक इन इंडियाचे प्रोडक्ट बाजारात येवू लागले आहेत. आपल्या जिल्ह्यात स्पर्धात्मक परिक्षा अकॅडमी फार कमी आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक परिक्षांमध्ये विद्यार्थी टिकताना दिसत नाहीत. ही भूमी कृषी प्रधान आहे आणि त्यात प्रज्ञावंत , बुध्दिमान मुले जन्माला आली आहेत. परंतु ज्या क्षेत्रामध्ये आपला टक्का वाढला पाहिजे , तो वाढताना दिसत नाही. मुलांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता आपल्या मातीत पिकणाऱ्या आणि उगवणा-या फळपिकांचे मार्केटिंग करुन स्वतः च उद्योजक व्हावे , असे प्रतिपादन वनश्री पुरस्कार विजेते , निवृत्त प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी केले.
आशिये ग्रामपंचायत सरपंच महेश गुरव यांच्या संकल्पनेतुन दहावी , बारावी गुणवंताचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते , यावेळी व्यासपीठार माजी सभापती दिलीप तळेकर , सरपंच महेश गुरव, चार्टड अकाऊंटंट अमोल खानोलकर , उपसरपंच संदीप जाधव,मालवणी कवी विलास खानोलकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , माजी सरपंच सदानंद बाणे , माजी सरपंच शंकर गुरव,ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, मानसी बाणे,विशाखा गुरव,संजना ठाकूर,ग्रामसेवक राकेश गोळवणकर, माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर,शिक्षक निलेश ठाकूर,संजय बाणे, सुनील बाणे, दिवाकर बाणे , निलेश ठाकूर आदींसह पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
डॉ. बाळकृष्ण गावडे म्हणाले , विद्यार्थ्यांनी दहावी बारावी झाल्यानंतर तुम्हाला आयटीआय मध्ये एवढे ट्रेंड आहेत , आज ती ट्रेंड असलेली मुलं फार कमी आहेत. आपल्याला जर
स्पर्धेत उतरायचे असेल तर स्वतः चांगला अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षा देताना अनेक अडचणी येत आहेत. आता कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेताना चांगली टक्केवारी आवश्यक आहे. सध्या सायन्स शाखेत प्रवेश मिळविताना खूप धडपड करावी लागत आहे.यासाठी गुणांची टक्केवारी वाढवली पाहिजे.नवीन शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षणाची अनेक कवाडे खुली झाली आहेत. प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी नवीन शैक्षणिक धोरण (nap)ने दिली आहे.त्याचा मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.गावडे यांनी केले.करिअरच्या माध्यमातून आपली ओळख आपण निर्माण केली पाहिजे असेही प्रा.गावडे यांनी मार्गदर्शनात सांगितले.
माजी सभापती तळेकर म्हणाले , सरपंच महेश गुरव यांच्या संकल्पनेतून हा गुणवंतांचा सत्कार सोहळा होत आहे. या व्यासपीठावर प्रत्येक क्षेत्रातला यशस्वी व्यक्तिमत्त्व असलेले चेहरे तुमच्यासमोर दिसत आहेत. आपले पालक मोल मजूरी करून कष्ट करून आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही , भले आपल्या पोटाला चिमटे काढून पालक राहत आहेत , त्यामुळे शालेय शिक्षण घेण्यासाठी न भरकटता प्रामाणिक अभ्यास करावा , मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे.
सरपंच महेश गुरव म्हणाले, आशिये ग्रामपंचायतच्यावतीने दहावी , बारावीतील गुणवंतांच्या सत्कारामागे एकच उद्देश आहे, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपला गाव उभा आहे , याची जाण असावी. विद्यार्थ्यांच्या जीवनात एक प्रेरणा देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत.
पत्रकार भगवान लोके म्हणाले , आशिये गावातील अनेकजण विविध क्षेत्रात अग्रस्थानी काम करत आहेत. आपल्या गावचे चार्टड अकाऊंटंट अमोल खानोलकर , दामोदर खानोलकर यांच्यासारखे अनेक रत्ने या मातीत मोठी झालेली आहेत. विद्यार्थी दशेत गुणवंतांच्या पाठीवर थाप मारुन प्रोत्साहन देण्याचे काम सरपंच महेश गुरव यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडत असलेल्या क्षेत्रात करिअर करावे .
प्रास्ताविक करताना शिक्षक निलेश ठाकूर म्हणाले, आमच्या ग्रामपंचायतच्यावतीने गुणवंतांचा सत्कार हा कार्यक्रम होत आहे. आमच्या गावाचे गुणवंत विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे.भविष्यातील यश मिळविण्यासाठी हे विद्यार्थ्यांना पुढील जीवनात कौतुकास्पद थाप या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकिता ठाकूर , तर आभार ग्रामसेवक राकेश गोळवणकर यांनी केले.