*कोंकण एक्सप्रेस*
*विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही गुरुंचे श्रेष्ठत्व प्रकर्षाने अधोरेखित ; विजयकुमार कदम*
*शिरगांव येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
*शिरगांव : संतोष साळसकर*
आजचं शिक्षण हे ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे आहे आपल्या शिष्याला ध्येयनिष्ठ बनविण्यासाठी संस्कारचे बिजारोपण करून प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन समाजात विशिष्ठ उंची प्राप्त करून देण्यासाठी सामर्थ्य देण्याचे कार्य निस्वार्थीपणे गुरु करीत असतात म्हणूनच विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही गुरुंचे श्रेष्ठत्व प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. असे प्रतिपादन शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम यांनी शिरगांव येथे केले.
देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना विजयकुमार कदम म्हणाले, ज्ञान, विद्वत्ता, सुसंस्कृतपणा, आदर आणि दातृत्वाचे प्रतिक म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु-शिष्य परंपरेला मोठा वारसा आहे जीवनाला आकार देण्याचे कार्य गुरुंनी केलेल आहे. गुरु-शिष्य परंपरेचा वारसा आजच्या पिढीनेही जपल्याचा सार्थ अभिमान वाटतो. गुरुंनी अनेक प्रतिभावंत व्यक्ती घडविल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच शिष्य कितीही मोठा झाला तरी तो आपल्या गुरुचरणी नतमस्तक होतोच. असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष पुंडलीक कर्ले यांच्या पुतळ्याला तसेच महर्षी व्यासमुमीच्या आणि सरस्वती मातेच्या प्रतिमांना पुष्पहार अपर्ण करून झाली. विद्यार्थीनींनी ताल सुरात गुरुस्तवन सादर केले. गुरुवर्यांना गुरुदक्षिणा दिल्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या गुरुविषयी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी व्यासपीठावर शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्षपदी संभाजी साटम, शाळा समितीचे सदस्य दिनेश साटम, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थव खरात याने तर सुत्रसंचालन तन्वी साटम हिने केले. उपस्थितांचे आभार अक्षरा ओटवकर हिने मानले.
संस्थेच्या पुंडलीक अंबाजी कर्ले कला-वाणिज्य महाविद्यालय तसेच माध्यमिक विद्यामंदीर कुवळे येथेही गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरी केली. यावेळी प्राचार्य समीर तारी प्राध्यापिका सिद्धी कदम, कोमल पाटील, अक्षता मोंडकर, सुगंधा पवार, मयूरी कुंभार, सोनाली ताम्हणकर, प्राध्यापक आशय सावंत तर माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संतोष साटम, श्रीनिवास रावराणे, प्रणिता कदम आदी उपस्थित होते.