*कोंकण एक्सप्रेस*
*दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यानी साजरी केली आगळी वेगळी गुरुपोर्णिमा : गुरूंचे पाद्य पूजन करून केला सन्मान*
*तळेरे ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा या उद्धेशाने माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड या आपल्या शाळेतील शिक्षकांचे सत्कार करण्याचे ठरविले. केवळ सत्कार न करता आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करून पुढील मुलांसमोर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला.
दिविजा वृद्धाश्रमाच्या संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कोळोशी शाळेचे माजी विद्यार्थी जे आज दिविजा वृद्धाश्रमात काम करत आहेत, त्यांनी गुरुपोर्णिमेदिवशी आपल्या शाळेतील गुरुजनांचा पाद्यपूजन करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गुरुजनांविषयी असलेले प्रेम या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दाखविले. पाद्यपुजनाचा एक संस्कार आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यां समोर केला गेला हा सत्कार कार्यक्रम होत असताना गुरुजनांचेही डोळे पाणावले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी गर्जे म्हणाल्या कि, आज शिक्षकांचा केलेला सन्मान हा अभूतपूर्ण सोहळा होता. शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा संस्कार फार महत्वाचा आहे. आपली भावना व्यक्त करताना मुख्याध्यापिका सौ अश्विनी गर्जे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. संपूर्ण वातावरण हे भावूक झाले. या सर्व विद्यार्थांना शिक्षकांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी समीर मिठबावकर, सायली तांबे, अश्विनी पटकारे, ऋतुजा इंदप, सौ अमृता इंदप, सौ सायली इंदप, सौ सानिया इंदप, सौ सारिका सावंत, भारती गुरव व संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये तसेच माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड शाळेचे सर्व शिक्षक समूह व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच श्री स्वामी समर्थ मठ हडपिड यांचेकडून गुरुपोर्णिमा निमित दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नदान साहित्य भेट देण्यात आले.