*कोंकण एक्सप्रेस*
*ईली हो ईलीत …पेडांवरील चविष्ट पौष्टिक अळंबी ईलीत…*
*कृषी विद्यापीठाने बायो नॅनो तंत्रज्ञानाने टिश्यू कल्चर कलमे तयार केल्यास बारमाही व्यावसायिक संधी : भाई चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकणात तरवा लावणीच्या दरम्यान कोकणवासीयांना वेध लागलेले असतात ते पेडांवर नैसर्गिकरित्या उगविणार्या अळंबीचे. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असलेल्या या अळंबीच्या शोधात प्रामुख्याने जाणकार धनगर समाजासह शेतकरी वर्ग असतो. वर्षातील ठराविक कालावधीत मुंग्यांच्या ठराविक पेडांवर ही अळंबी उगवायला लागतात. सद्या या अळंबीचे वाटे कोकणातील बाजारपेठांमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. ईली हो ईलीत…पेडांवरील चविष्ट आणि पौष्टिक अळंबी ईलीत, या मौखिक प्रचाराने जाहिरात होत असल्याने खवय्यांकडून ती हातोहात खरेदी केली जात आहेत, अशी माहिती कोकण विकास आघाडीचे प्रमुख संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोविआ गेली अनेक वर्षें कोकणातील या नैसर्गिकरीत्या मुंग्या़ंच्या पेडांवर उगविणार्या वैशिष्ट्यपुर्ण अशा चविष्ट आणि पौष्टिक अळंबीवर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करुन या अळंबीचा वाण विकसित करुन बारमाही उत्पादनासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी करीत आहोत, अशी माहिती देऊन ते म्हणतात, आज जगभरात भरघोस उत्पादनासाठी शेती, बागायतींमध्ये आधुनिक बायो नॅनो तंत्रज्ञान वापरून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. कृषी विद्यापीठाने या कालावधीतील ही अळंबी उपलब्ध करुन त्यावर बायो नॅनो तंत्रज्ञानाने टिश्यू कल्चरच्या ( ऊती संवर्धन)
माध्यमातून कलमे तयार करावीत. वारुळासारख्या मातीची निर्मिती करावी. त्यावर नैसर्गिकरीत्या उगविणार्या या अळंबीची कुत्रिमरित्या उत्पादन घेण्याची पद्धत विकसित करावी. त्यामुळे कोकणातील तरुणांना स्वयं रोजगाराची संधी बारमाही उपलब्ध होईल.
आजमितीस जगभरातील रेस्टारंटासह अनेक स्टार असलेल्या हाॅटेल्समध्ये मशरुममध्ये विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. मात्र ही अळंबी गवताच्या पेढ्यांमध्ये कुत्रिमरित्या तयार केली जाते. तिचा किलोचा दर रुपये ४०० ते ५०० दरम्यान असतो, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, पेडांवरील या अळंबीच्या वाट्यांचे वजन केल्यास या अळंबीचा किलोचा दर रुपये १००० ते १२०० पर्यंत जातो. तरीही खवय्यांकडून ही अळंबी हातोहात खरेदी केली जाते. भाजी विक्रेत्या सुरेखा जैतापकर हिने दोन दिवसांपूर्वी धनगर समाजाकडून रुपये
१०, ००० ची अळंबी खरेदी केली. पण तीही न पुरल्याने तिने आणखी रुपये २००० ची अळंबी मागून घेतली. त्यावरून या अळंबीचे महत्त्व लक्षात येईल.