*कोंकण एक्सप्रेस*
*विम्याबाबत शेतकऱ्यांना योग्य न्याय देणार: नितेश राणे*
*देवगड ः प्रशांत वाडेकर “
देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांना वीमा कंपनीच्या माध्यमातून योग्य मोबदला मिळत नाही. त्यांनी निर्माण केलेली हवामान केंद्र योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. राज्यातील अन्य भागापेक्षा कोकणातील हवामान वेगळे असून नुकसानीचे बदलण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्याच्या कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येईल. विमा कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत येत्या दहा दिवसात बैठक घेऊन योग्य मार्ग शेतकऱ्यांना दिला जाईल. सकारात्मक अशी भूमिका आंबा बागायतदार शेतकरी यांच्या बाबत असेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात रविवारी आंबा व इतर फळ बागायतदार संघटनेच्या सभासदांसमवेत पालकमंत्री नितेश राणे यांनी सभा घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास रुमडे, माजी आमदार अँड अजित गोगटे, भाजपचे उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, डॉ. अमोल तेली, भाजप मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, देवगड तहसीलदार आर. जे. पवार, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विलास रुमडे यांनी आंबा बागायतदार, शेतकरी यांच्या विविध समस्या बाबत पालकमंत्री यांना माहिती दिली. कोकणात शेती बागायतीचे नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान पाहता विमा कंपनी योग्य प्रकारे लाभ देत नाही. मे महिन्याच्या १५ तारीख पासून मुसळधार पाऊस पडतो. यात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यांच्या निकषात १५ मेपर्यंत पाऊस पडला तरच नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे या नियमात बदल होऊन ३१ मे पर्यंत वाढ व्हावी अशी मागणी केली. चंद्रकांत गोईम यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी ३ कोटी २८ लाख रुपये विम्यापोटी भरले आहेत. त्यामधून ५४ लाख ६० हजार विम्याचे परत मिळाले अन्य बागायतदार यांना विम्याचा कोणताही लाभ झाला नाही. विमा कंपनीच्या हवामान केंद्रात ज्या नोंदी होतात त्यांच्या मध्ये प्रचंड तफावत असल्याने निकषात नुकसान बसत नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळत नाही. आकडेवारी चुकीच्या पद्धतीने दिली जाते असे सांगितले. माजी आमदार गोगटे यांनी हवामान केंद्र हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. अनेक केंद्र निर्माण करा परंतु त्यांची निगा राखली नाही तर हवामानाचा अचुक अंदाज व आकडेवारी मिळणार नाही. विमा कंपन्या स्वतः रिपोर्ट तयार करतात. त्यांनी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी किंवा महत्त्वाच्या व्यक्तीं समोर आकडेवारी नोंद घेऊन तो रिपोर्ट सादर केला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. किंवा शेतकरी संस्था यांना नियमितपणे माहिती द्या. शेतकऱ्यांना सोशल मिडीयावर माहिती दिली तर त्याच्या मध्ये पारदर्शकता येईल. स्थानिक राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाटाळा करीत आहे. शासनाच्या वतीने देण्यात येणारे बिनव्याजी कर्जही ते देत नाहीत. आंबा पिकवून आता शेतकरी विक्री करीत आहे. जास्त प्रमाणात आंबा असतो त्यासाठी डायपरींग सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. कीटकनाशके औषधांवर कोणाचेही नियंत्रण नाही. विक्रते हव्या त्या किंमतीत औषधे विकत आहे. यावल नियंत्रण असावे. प्रयोगशाळा निर्माण व्हावी असे सांगितले. श्रीकांत नाईकधुरे यांनी माकडांचा मोठा उपद्रव होत असून त्याबाबत उपाययोजना करण्यात यावी असे सांगितले. प्रकाश राणे यांनी आंबा कँनिंगला हमीभाव मिळावा अशी मागणी केली. इम्रान साटविलकर यांनी खावटी कर्ज माफी मिळावी अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री राणे यांनी विमा कंपन्या च्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येत्या दहा दिवसात बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल. ३१ मेपर्यंत विम्याची मुदत वाढ मिळाली पाहिजे. कारण १५ मेपासुनच मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान विम्यापोटी मिळण्यास अडचण होते. यासाठी राज्याचे कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करून कोकणासाठी निकष बदलण्याची मागणी करुन त्यात निर्णय घेण्यात येईल. कोकणाचे अर्थकारण आंबा, मासे, शेती यावर आधारित आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात झालेल्या नुकसानीचा लाभ मिळाला पाहिजे याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधी वर आहे. त्यामुळे केवळ आश्वासन दिले जाणार नसून तुमच्या मागणीप्रमाणे न्याय मिळवून दिला जाईल असा ठाम विश्वास पालकमंत्री यांनी दिला. यावेळी निलेश पेडणेकर, संदीप मालवणकर, रामदास अनभवणे यांनी मत मांडले. स्वागत विलास रुमडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संजय धुरी यांनी मानले.