*कोंकण एक्सप्रेस*
*श्री विठ्ठल रखुमाई मंदिर,कलमठ येथे आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा*
*कलमठ ः प्रतिनिधी*
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, कलमठ येथे आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्रींचा पारंपरिक एकादशमी अभिषेक करण्यात आला. मंदिर समितीतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गणेश मॉन्स्टसरी प्ले स्कूल, बिडयेवाडी, कलमठ यांच्या वतीने वारकरी परंपरेनुसार भव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत लहानग्या विद्यार्थ्यांनी भगव्या पताका हातात घेत, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘विठ्ठल विठ्ठल’ जयघोष करत सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि मुक्ताबाई यांची वेशभूषा परिधान करून वारीचे सुंदर सादरीकरण केले. या दिंडी सोहळ्याला उपस्थित भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
दुपारी श्री स्वामी समर्थ पठणाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी श्रवणीय भजनाचा कार्यक्रम रंगला. त्यानंतर मंदिरातून श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली.
विशेष आकर्षण म्हणजे, सालाबादप्रमाणे शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ पासून संध्याकाळी ७.३० वाजता मंदिरात पालखी प्रदक्षिणेला सुरुवात झाली आणि पुढील पाच दिवस दररोज भक्तिमय वातावरणात पालखी प्रदक्षिणा पार पडणार आहे.
मंदिर समितीतर्फे सर्व भक्तांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यसंचय करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.