*कोंकण एक्सप्रेस*
*मूर्तिकार दाजी मेस्त्री यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविताना मान्यवर*
*मालवण : प्रतिनिधी*
सुतार समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्गत, उपकंपनी म्हणून ‘संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. हे समन्वय समितीच्या व सकल सुतार समाजाच्या लढ्याला मिळालेले ऐतिहासिक यश आहे. सध्या या आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपयाचा वार्षिक निधी उपलब्ध झाला असून तो संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे खर्ची व्हावा यासाठी सुशिक्षित आणि तरुण समाज बांधवांनी ही योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून द्या असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर यांनी कुंभारमाठ येथे केले.
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समितीच्या वतीने तालुक्यातील सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि समाज बांधव मेळावा कुंभारमाठ जानकी मंगल कार्यालय येथे नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर, विश्वकर्मा क्रांती दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ नांदेड, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव सुतार सातारा आणि पुणे शहरातील सुतार समाज संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत असतानाच समन्वय समिती महाराष्ट्रच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष वास्तवात आलेल्या संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची माहिती श्री. मानकर यांनी उपस्थित समाज बांधवांना दिली.
विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ यांनी समाजावर होणारे अन्याय यावर परखडपणे बोलत असताना वेळ पडल्यास जशास तसे उत्तर द्या. अन्याय करणाऱ्या बरोबरच अन्याय सहन करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो अशा प्रकारचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील सुतार समाज हा ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांपैकी एक प्रमुख समाज आहे. प्रत्येक समाज घटकाच्या विकास हे राज्य शासनाचे उद्दिष्ट्य आहे. या भूमिकेतून आणि भावनेतूनच सुतार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ निर्मिती झाली आहे. येत्या काळात भोजलिंग काका सुतार समाज महामंडळाच्या माध्यमातून सुतार समाजातील विद्यार्थ्यांसाठी, माता भगिनींसाठी आणि तरुण उद्योजकांकरिता विविध योजना राबविता येत आहेत. त्यामुळे समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे, यातून सुतार समाजासाठी विकासाची दिशा मिळू शकेल, असा विश्वास कोकण विभाग समन्वयक आनंद मेस्त्री यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रसिद्ध मूर्तीकार बाळकृष्ण उर्फ दाजी मेस्त्री यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘समाज रत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समितीचे राज्य समन्वयक आनंद मेस्त्री, जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री, राजू मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, बाबाजी मेस्त्री, विलास मेस्त्री, अरुण मेस्त्री, अमिदी मेस्त्री, आरती मेस्त्री, अस्मिता मेस्त्री, राजश्री मेस्त्री, शंकर मेस्त्री, संतोष मेस्त्री, सचिन मेस्त्री, सुहानी मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, महेश मेस्त्री, आशिष अनावकर, नंदू मेस्त्री, संजय मेस्त्री, दाजी मेस्त्री, भास्कर मेस्त्री, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे सुतार समाज मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील सुतार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.